ज्येष्ठ भाजप नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.    

जवळपास 45 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असणार्‍या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होणार असून, त्याबाबतचा निर्णयही होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्याच्या घडीला जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांसमवेत खुद्द शरद पवार आणि अजित पवार बैठक घेत आहेत. या बैठकीला जळगावमधील माजी आमदार गुलाबराव देवकर, सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंनी आपली अस्वस्थता, नाराजी वांरवार व्यक्त केली आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी केलेली व्यक्तव्ये आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली उत्तरं पाहता एकनाथ खडसे आता निर्णायक टप्प्यापर्यंत आलेले आहेत असं दिसतं. त्यामुळं नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशा चर्चेनं जोर धरला आहे.