कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षा वाढवा

नवी मुंबई महिला मोर्चाची मागणी ; आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई ः राज्यभरातील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये महिला रुग्णांवर अत्याचार व व छेडछाडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्या पार्श्‍वभुमीवर नवी मुंबईतील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षा वाढविण्यात यावी असे निवेदन नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीने पालिका आयुक्त व परिमंडळ 1 चे पोलिस उप आयुक्त यांना देण्यात आले. 

कोरोना महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामध्ये अगदी लहानमुलींपासून ते वयोवृद्ध महिला या अत्याचाराला बळी पडत आहेत. परिणामी, कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या महिला सुरक्षित नाहीत का?, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबईतील महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यावतीने नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर तसेच परिमंडळ 1 चे पोलिस उप आयुक्त पंकज डहाणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. कोविड सेंटरमध्ये महिलांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षा हि वाढविण्यात यावी त्यासाठी कोविड सेंटरमध्ये पीपीई किट मध्ये  24 तास महिला कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात यावी. तसेच रात्रीच्या वेळीस प्रत्येक कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांमार्फत गस्तही घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेविका नेत्रा शिर्क व नवी मुंबई महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.