1 कोटी अतिरिक्त शुल्क रुग्णांना परत

नवी मुंबई : कोविड रुग्णांना जादा बिल आकारणार्‍या काही खाजगी रुग्णालयांवर पालिकेने कारवाई केली आहे. आतापर्यंत 1 कोटी 36 लाख रुपये नागरिकांना परत मिळवून दिले आहेत. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यात आली असून, सर्व बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी केली जाऊ लागली होती. रुग्णालयांकडून होणार्‍या लुबाडणुकीविषयी अनेकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. मनसेनेही याविषयी आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. या प्रकाराची दखल आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेऊन, खासगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमावलीप्रमाणेच बिलांची आकारणी करावी, असे आदेश सर्व व्यवस्थापनांना दिले होते. लुबाडणूक थांबविण्यासाठी तक्रार निवारण केंद्र सुरू केले. बिलांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. महानगरपालिकेकडे आलेल्या तक्रारीची 24 तासांत दखल घेण्यास सुरुवात झाली. याशिवाय आयुक्तांनी मार्चपासूनची सर्व बिले तपासण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तक्रारी न आलेली बिलेही तपासण्यास सुरुवात झाली व रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले शुल्क परत करण्यास सुरुवात केली. महानगरपालिकेने 13 सप्टेंबरपर्यंत 32 लाख 322 रुपये नागरिकांना परत मिळवून दिले होते. त्यानंतरच्या काळात कोरोना तक्रार निवारण केंद्रातील हेल्पलाइन नंबर व व्हॉट्सअप अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारींची छाननी करून 12 रुग्णालयांना 41 लाख 38 हजार 797 रुपये परत करण्यास लावले. महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांमधील मार्चपासूनची बिले तपासण्यासाठी 6 विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी 812 पैकी आतापर्यंत 662 देयकांची तपासणी केली. रुग्णांकडून 62 लाख 88 हजार 823 रुपये अतिरिक्त स्वीकारल्याचे निदर्शनास आले असून, संबंधित पाच रुग्णालयांना सदर रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोना रुग्णांवरील उपचार पद्धती व आकारल्या जाणार्‍या देयक रकमांवर नियंत्रण ठेवण्याविषयी निर्देश प्रशासनास दिले आहेत.