केमिकल गाळ विघटनाचा बेकायदेशीर प्लँट

युवासेनेने केला टोळीचा पर्दाफाश

पनवेल ः तळोजा औद्योगिक वसाहतीत अनधिकृतपणे प्लँट उभारून त्या मार्फत केमिकल गाळाचे विघटन करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश युवासनेनेने केला आहे. यासंदर्भात सर्व माहिती युवासेनाप्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे युवासेना सहसचिव रूपेश पाटील यांनी पाठविले आहे. 

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील असलेल्या केमिकल कंपन्यांमधून केमिकल गाळ हा अधिकृतपणे विघटन करण्याकरीता शासनाच्या नियमाने उभारलेल्या मुंबई मॅनेजमेंट वेस्ट या नावाने कार्यरत आहे. त्यांच्याद्वारे अधिकृत गाडीने सदर गाळ विघटीकरण केंद्रात नेला जातो. परंतु असे न करता या रासायनिक गाळाचा टॅक खाजगी वाहनाने विनापरवाना कोणतेही कागदपत्रे नसताना तळोजा येथील नदीच्या जवळ बेकायदेशिररीत्या उभारलेल्या प्लँटमध्ये नेण्यात येत असून व तेथे विघटन केलेले सर्व घातक केमिकल हे नदीच्या पात्रात सोडून देण्यात येते. त्याचा परिणाम तळोजा, खारघर, कळंबोली आदी परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे व नदीसुद्धा दूषित होत आहे. सदर प्लँट बद्दल युवासेनेचे सहसचिव रूपेश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. सदर प्लँटला भेट दिली असता तेथे असलेले कामगार व इतर कर्मचारी पळून गेले. त्यामुळे या ठिकाणी बेकायदेशीर काम होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारच्या काही गाड्या तळोजा परिसरात बेकायदेशीररित्या फिरत असून सदर गाड्यांवर प्रदूषण महामंडळाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करणे गरजेचे आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पुराव्यासह पाठविल्याचे रूपेश पाटील यांनी सांगितले आहे. तरी संबंधित विभागाने सदर प्लँटसह नियम ढाब्यावर बसविणार्‍या सर्व कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेने केली आहे.