यशस्वी अर्जदारांना विलंब शुल्क माफ

सिडकोचा निर्णय ; लाभार्थ्यांना पुनःश्च संधी 

नवी मुंबई ः सिडको गृहनिर्माण योजना 2018 मधील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच आता 24 मार्च 2020 ते 28 डिसेंबर 2020 पर्यंत विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अंदाजे 2000 कुटुंबांना त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची पुनःश्च संधी प्राप्त झाली आहे. 

कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेली देशव्यापी टाळेबंदीमुळे शुल्क भरण्यास येणार्‍या अडचणी, आर्थिक समस्येचा करावा लागणारा सामना तसेच सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असणे, या बाबींचा विचार करून यापूर्वीच सदनिकांचे हफ्ते भरण्यास 30 जून 2020 व त्यानंतर 29 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सदनिकांचे हफ्ते भरण्यास सिडकोतर्फे अर्जदारांना पुनःश्च 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या मुदतवाढीच्या निर्णयानुसार ज्या अर्जदारांनी वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांपैकी कोणत्याही हफ्त्याची रक्कम भरली असेल अशा अर्जदारांना 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येऊन टाळेबंदीच्या सुरुवातीपासून दि. 24 मार्च 2020 ते दि. 28 डिसेंबर 2020 पर्यंत विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वीच वाटपपत्रात नमूद एक ते चार हफ्त्यांची पूर्ण रक्कम भरली असेल व टाळेबंदीच्या कालावधीमध्ये ज्यांना पाचवा व सहावा हफ्ता भरणे शक्य झाले नसेल, अशा अर्जदारांनादेखील 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यावर कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. सिडकोतर्फे पुन्हा एकदा देण्यात आलेल्या या संधीमुळे अंदाजे 2000 कुटुंबियांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.