वरुन कीर्तन आतून तमाशा

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात बंद असणार्‍या देवालयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लवकरात लवकर मंदिरे उघडण्याची सूचना केली. खरं तर राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असल्याने व हे पद संविधानात्मक दर्जाचे असल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांना सल्ला व मार्गदर्शन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. राष्ट्रपती हे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ याच्ंया सल्ल्याने तर राज्यपालांनी त्या-त्या राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळालाच्या सल्ल्याने कारभार करायचा असतो. त्यामुळे राज्यपालांनी संबंधित राज्याच्या मुख्यमंत्रांसोबत सौदार्ह्य पूर्ण संबंध ठेवून कामकाज करणे हे देशाच्या घटनेला अभिप्रेत आहे. परंतु, या पदावर निवृत्त झालेल्या राजकर्त्यांची वर्णी लागण्यास सुरुवात झाली तेव्हापासून या पदाची गरिमा दिवसेंदिवस ढासळत असल्याचे चित्र आज देशात पाहायला मिळत आहे.

देशात कोरोनाचे आगमन झाल्यापासून अनेक उपाययोजना पंतप्रधान मोदी व राज्यांच्या मुख्यमंत्रांनी आखल्या आहेत. त्यामध्ये लोकांनी मोठ्याप्रमाणात एकत्र येऊन कोरोनाचा प्रसार करू नये हा उद्देश होता. त्यामुळे लोकांना एकत्र आणणार्‍या अनेक गोष्टींवर बंदी सरकारने घातली आहे. त्यामध्ये सिनेमागृहे, तरणतलाव, मंदिरे, उत्सव यांवर पूर्ण बंदी घातल्याने मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमण आटोक्यात आणणे महाराष्ट्र सरकारला शक्य झाले आहे. अजूनही कोरोना संक्रमणाचे सावट राज्यात असताना राज्यपालांनी मंदिरे उघडण्यास सांगावी याचे मोठे आश्चर्य वाटते. वास्तविक पाहता ज्या संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी हि निवेदने त्यांना दिली त्यांचेच बौद्धिक घेऊन त्यांना तूर्त थांबण्याचा सल्ला दिला असता तर ते अधिकच उचित ठरले असते. परंतु ठाकरे सरकारला घेरण्याचा नादात आपण राज्यपाल सारख्या संविधानिक पदाचा गैरवापर करत आहोत, त्याची गरिमा धुळीस मिळवत आहोत याचे भान ना विरोधकांना ना राज्यपालांना असल्याचे सध्या राज्यात सुरु असलेल्या ‘वरुन कीर्तन आतून तमाशा’ या नाट्यावरून जाणवते. 

राज्यपालांनी राज्य प्रमुखांना सूचना करणे यात काहीच गैर नाही परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवताना ज्या भाषेचा उल्लेख त्यांनी पत्रात केला तो निश्चितच या पदाची गरिमा खाली आणणारा आहे. याची दखल घेऊन शरद पवार यांनी हि बाब लगेचच पंतप्रधान मोदींच्या नजरेस आणून दिली. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये नाराजीचे सूर या पत्रातील मजकुरावरून उठल्याने ‘करायला गेला गणपती आणि झाला मारुती’ अशी अवस्था राज्यपालांसह राज्यातील भाजपाची झाली. ज्याने कोणी हा मजकूर राज्यपाल महोदयांना दिला त्याच्याही बुद्धिमत्तेची करावी तेवढी कीव थोडीच आहे. भगतसिंग कोश्यारी हे स्वतः एका राज्याचे मुख्यमंत्री होते याचा विसर त्यांना पडला हे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे द्योतक आहे. राज्यात महाआघाडी सरकार आल्यामुळे भाजपावाले किती बिथरले आहेत याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. 

उद्धव ठाकरे यांनीही कोश्यारींना ठाकरी शैलीत उत्तर देऊन आपण कशापद्धतीने कोरोना संक्रमण काळात राज्याचा गाडा हाकत आहोत याची जाणीव करून दिली. आज भाजपावाले राज्यात बार उघडले म्हणून मंदिरे उघडा असे सांगत कारकर्त्यांना आंदोलनासाठी उकसवत आहेत. पण अजून एक महिना मंदिरे उघडली नाही तर कोणते संकट लोकांवर येईल याचा तपशील देण्यास ते विसरत आहेत. याउलट लोकांनी सरकारला पदोपदी सहकार्य करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. शेकडो वर्ष सुरु असलेली जगप्रसिद्ध पंढरीची वारी यावेळी वारकर्‍यांनी टाळली, गणेश उत्सव साधेपणाने साजरा केला, मुस्लिम बांधवानी ईदही घरातल्या घरात साजरी केली. असे असताना भाजपवाले मात्र मंदिरे उघडण्याचा जयघोष का करत आहेत याचा विचार आता लोकांनी करण्याची वेळ आली आहे. आज शाळाही बंद असून लाखो विद्यार्थी घरातल्या घरात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परीक्षा घेण्यावरही वारंवार राजकारण होत आहे. उद्या जर मंदिरातील गर्दींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर हीच लोक पुन्हा सरकारवर बोट ठेवायला मोकळे आणि पुन्हा मंदिराच्या नावावर मते मागायलाही मोकळे.

हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेणारे आणि भारताला विश्वगुरू बनवण्यात आघाडीवर असणारे भाजपावाले परमेश्वर चराचरात असतो हे कसे काय विसरले याचे अप्रूप वाटते. याउलट परमेश्वर जळी, स्थली व पाताळी आहे यावर विश्‍वास ठेवून नागरिकांनी घरातूनच परमेश्वराला हात जोडून या संकटातून बाहेर काढण्यासाठी साकडे घातले. सर्वांनी नियमांचे पालन करून सरकारला पदोपदी सहकार्य करून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. 

राज्यपालांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमची हिंदुत्वाची भूमिका सोडून धर्मनिरपेक्ष झालात का ? असा सवाल विचारला आहे. हे लिहिताना पत्रात ठाकरे यांनी केलेली अयोध्यावारी व पंढरीच्या विठोबाच्या पूजेचा उल्लेख केला. खरतर असा प्रश्न ज्यांनी घटनेची शपथ ज्या संविधानिक पदावर आरूढ होताना घेतली त्या व्यक्तीने विचारणे म्हणजे घटनेच्या मूळ गाभ्यालाच छेद देण्यासारखे आहे आणि त्यामुळे त्याचे गांभीर्य अधिकच होते. यावरून दोन घटनादत्त पदांवर काम करणार्‍या व्यक्ती किती घटनेचे पालन करतात हे आपोआप सिद्ध होते. उद्धव ठाकरे हे कट्टर हिंदुत्वाचे समर्थक असूनही मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक भूमिकेला मुरड घातली आणि सबका साथ सबका विकास हा मार्ग स्वीकारला तर राज्यपालांच्या भूमिकेवरून ते हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचे जाणवते. राज्यपालांची हि भूमिका देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचवणारी आहे. 

आज महाराष्ट्रातील राजभवन राजकारणाचा अड्डा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एका रात्रीत उठवण्यात आलेली राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि सकाळी 7 वाजता देवेंद्र फडणवीस यांना दिलेली मुख्यमंत्री पदाची शपथ हे भगतसिंग कोश्यारी यांच्या राजकीय जीवनातील अत्युच्य क्षण ठरतात. आजकाल उठ सुठ कोणीही उठतो आणि राज्यपालांना निवेदन देणारे फोटो सोशल  मीडियावर टाकतो यावरून राज्यपालांची राजकारण करण्याची इच्छा अजूनही अतृप्त असल्याचे जाणवते. राजभवनावर फेर्‍या मारणार्‍यांमध्ये  भाजप कार्यकर्त्यांचा जास्त वावर असल्याचे पाहावयास मिळते. कसेही करून महाआघाडीला सत्ताच्यूत करण्याचा चंग भाजपने बांधलेला दिसत आहे आणि त्याला साथ राज्यपालांची मिळत असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. उद्धव ठाकरेंना डिवचणार्‍या अभिनेत्री कंगना रौनावतचे राजभवनाने केलेले स्वागत आणि त्यानंतर कंगनाने महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे म्हणून केलेली मागणी यामध्ये बरेच काही दडले आहे. त्याच बरोबर अभिनेत्री पीयूष गोयल हिचेही स्वागत ज्या पद्धतीने करण्यात आले त्यावरून राजभवनाच्या भूमिके बद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकते. कोश्यारी यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी खुशाल करावे पण त्यासाठी राज्यपाल सारख्या संविधानिक पदाचा वापर होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी. आपण घालून देत असलेल्या प्रथा उद्या आपणावरच उलटू शकतात याचे भान त्यांनी ठेवावे.  

देव, धर्म आणि आपली श्रद्धा स्थाने यांचा वापर राजकर्त्यांकडून सार्वजनिक जीवनात होऊ नये असे असलेले संकेत हल्ली दररोज पायदळी तुडवताना पाहायला मिळत आहेत. अन्य राज्यांनी मंदिरे उघडली म्हणून महाराष्ट्रानेही उघडावी असे सांगणारे राज्यपाल महाराष्ट्र कोरोना संक्रमित राज्यात देशात प्रथम आहे हे सोईस्करपणे विसरतात. महाराष्ट्र जगात कोरोना संक्रमित क्रमांकात 5व्या स्थानावर असल्याने मुख्यमंत्री जास्तच खबरदारी राज्याचा गाढ हाकताना घेत आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार याचे भान उद्धवजींना आहे. खुद्द पंतप्रधानांनी ठाकरेंच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे तेही महाराष्ट्रातील भाजप नेते राजकारणसाठी सोयीस्करपणे विसरले आहेत. आज महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून बहुतांश उद्योग धंदे पूर्णपणे सुरु झाले आहेत. जर विरोधकासारखा आक्रस्ताळेपणा मुख्यमंत्र्यानी केला असता तर राज्यात भयानक परिथिती उद्भवली असती. येत्या 15 दिवसात मेट्रो आणि रेल्वे सुरु होण्याची चिन्हे राज्यात असून डिसेंबर नंतर शाळाहि सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. एका पुरोगामी विचारधारा असलेल्या राज्याला योग्यवेळी संयमशील नेतृत्व मिळाल्याने हे शक्य झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही राज्य योग्य व्यक्तीच्या हातात असल्याची भावना वाढत आहे. त्यामुळे ‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा’ करणार्‍यांनी राज्यहितासाठी भानावर येण्याची गरज आहे.