महापालिकेतील प्रशासकांना मुदतवाढ

नवी मुंबई ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुदत संपलेल्या आणि निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या 12 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार अध्यादेश काढण्यात येणार आहे.

राज्यातील संभाजीनगर, नवी मुंबई आणि वसई- विरार महापालिकेसह इतर आठ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची मुदत मे आणि जून 2020 मध्ये संपली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या संस्थांमध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये प्रशासकाचा कालावधी सहा महिन्यांपेक्षा जास्त करण्यासंदर्भात सुधारणा करणे गरजेचे होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे