महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईसाठी 268 कोटी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने विविध राज्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 4381.88 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानासाठी 268.59 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाई पोटी 1 हजार 65 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, महाराषट्राला अवघे 268 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वातील समितीनं सहा रांज्यासाठी हे पॅकेज जाहीर केले. गृह मंत्रालयाद्वारे ही मदत नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रासारख्या राज्यांना अम्फान निसर्ग यांसारख्या वादळांनी तडाखा दिला. तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांना पुराचा सामना करावा लागला. तसेच सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रासोबत, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम या राज्यांना देखील मदत करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तटपुंजी मदत करण्यात आली आहे. यामध्ये ‘अम्फान’ वादळाचा सामना करणार्या पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 4381.88 पैकी 2707.77 कोटी रुपये पश्चिम बंगालला देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला निसर्ग चक्रीवादळासाठी 268.59 कोटी, मान्सून पावसादरम्यान पूर आणि भूस्खलनासाठी कर्नाटकला 577.84 कोटी, सिक्कीमला 87.84 आणि मध्यप्रदेशला 611.61 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राने 1 हजार 40 कोटींची मदत मागितली असताना कमी मदत देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.