कामगारविरोधी धोरणाचा इंटककडून निषेध

नवी मुंबई : केंद्र सरकारकडून गेल्या काही महिन्यापासून सातत्याने घेण्यात येत असलेल्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. गुरूवारी (दि. 26) नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील महापालिका रूग्णालय व सानपाडा येथील नागरी आरोग्य केंद्रात तसेच एमआयडीसी परिसरात व इतर विविध ठिकाणी कामगारांनी निदर्शने करण्यात आली.

सर्वप्रथम नवी इंटकच्यावतीने वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी कामागार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यात रूग्णालयीन कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी रविंद्र सावंत यांनी ‘रद्द करा, रद्द करा, कामगारविरोधी काळे कायदे रद्द करा, अशा घोषणा दिल्या. वाशी हॉस्पिटल वॉर्ड बॉय संघटनेचे अध्यक्ष सुहास म्हात्रे, बहूउद्देशीय सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष कमलेश आठवले, इंटकप्रणित माथाडी  संघटनेचे नेते दिनेश गवळी, कुणाल खैरे, मनीष महापुरे, संग्राम इंगळे आदी सहभागी झाले होते. रूग्णालयीन परिसरात रूग्णांना निदर्शन कार्यक्रमाचा त्रास होणार नाही याची इंटकच्या पदाधिकार्‍यांकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.

यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी गेल्या काही वर्षापासून केंद्राच्या कामगारविरोधी धोरणामुळे कामगारांची वाताहत झाली आहे. बेरोजगारीत वाढ झाली आहे. कायम कामगारांच्या कायम सेवेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमित काम करणार्‍या कंत्राटी कामगारांची कायम सेवा व्हावी, कामगारविरोधी लेबर कोड त्वरीत मागे घ्या, कामगार व शेतकरीविरोधी  केलेले काळे कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांसाठी व कामगारांवर केंद्राकडून होत असलेल्या अन्यायाचा आणि उद्योजकधार्जिणे निर्णय घेवून कामगारांना देशोधडीला लावणार्‍या कृत्याचा निषेध करत असल्याचे सांगितले.

वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयानंतर सानपाडा येथील महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोर निदर्शने करण्यात आली. यात नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातही इंटकच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.