अर्ध मत्सेंद्रासन

अर्ध मत्सेंद्रासन हे आसन नवनाथापैकी प्रमुख सतगुरु मत्सेन्द्रनाथ स्वामीच्या नावाने ओळखले जाते. कदाचित त्यांनी हे आसन त्याच्या अनुभवाने संशोधनाने शोधले असावे. पण असे सांगितले जाते की स्वामी मत्सेंद्रनाथाच्या आवडीचे असे हे आसन मानले जाते.
आपण पाहीले आहे की प्रत्येक आसनामध्ये पाठीच्या कण्याला पुढे अथवा मागे वाकवून अथवा उजव्या किंवा डाव्या बाजूला झुकवून सराव करायचा. अशी बरीच आसने आपण पाहीली तसेच आपण पाठीच्या कण्याला ताण देणारी आसने पण पाहीली. आज जे आसन आपण पाहणार आहोत ते आहे अर्ध मत्सेंद्रासन. या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये पाठीच्या कण्याला सुखकारक पीळ बसतो. त्यामुळे स्नायू, मज्जातंतू फारच ताणले जातात. तर आता आपण याचा पुर्ण अभ्यास करु.
आसनामध्ये जाण्याची कृती
दोनही पाय पसरुन आरामदायी स्थितीमध्ये रहावे. नंतर शरिर सरळ करावे. डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून छातीच्या बाजुस आणावा. नंतर उजवा पाय जमिनीवर दुमडून डावी टाच व पार्श्वभाग यामधून सरपटत दोनही हाताच्या सहाय्याने उजवी टाच जनेनंद्रियाजवळ आणावी व स्थिर ठेवावी. उजवा गुडघा जमिनीवर असावा. आता दोनही हाताच्या सहाय्याने डाव्या पायाची पाऊल उजव्या गुडघ्याबाहेर उचलून ठेवावे. पायाचा पंजा पुढील बाजूस असावा. आता डाव्या हाताने डाव्या गुडघ्यास बाहेरच्या बाजूने उजवीकडे दाब द्यावा. उत्तमांगाला डावीकडे पीळ देऊन डावा गुडघ्या उजव्या बाजूच्या बगलेत स्थिर करावा. उजवा हात डाव्या गुडघ्याच्या बाहेरील बाजूने खाली आणावा आणि उजव्या हाताच्या पहील्या बोटाचा हूक करुन न्यावे, डाव्या पायाचा अंगठा पकडावा आता उत्तमांगाचा डावा भाग मागून उजवीकडे झुकवावा, उत्तमांग पाठीच्या कण्यामध्ये सरळ असावे. आता डावा खांदा पाठीमागे उजव्या बाजूस जाईल त्यामुळे पाठीच्या कण्याला सुखावह पीळ बसेल. आता दोनही खांदे एका रेषेमध्ये येतील असा प्रयत्न करावा. आता डावा हात पाठीकडून आणून डाव्या हाताच्या पंजा उजव्या जांघेत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आता मान खांद्याच्या रेषेत मागे वळवावी व नंतर खांद्यांवर स्थिर करावी. हनुवट खांद्याला समांतर असावी. ही झाली आसनाची अंतिम स्थिती. आता या स्थितीमध्ये प्रयत्नशैथिल्य करावे. चेहर्याचे स्नायू शिथील करावे. दोनही हात शिथील असावे. श्वासप्रश्वास नैसर्गिक असावा आणि मनाला श्वासावर केंद्रित करावे. आपल्या क्षमतेनुसार आसनामध्ये रहावे. आसनामधून बाहेर येताना पहील्यांदा मान सरळ करावी. डावा हात पाठीकडून डाव्या बाजूकडे आणावा, डाव्या हाताने डावा गुडघा सोडवून घ्यावा. नंतर डावा पाय दोनही हाताने उजव्या गुडघ्याबाहेर उचलून डावीकडे आणून जमिनीवर ठेवावा. उत्तमांग सरळ करावे. उजवा पाय सरळ करावा नंतर डावा पाय सरळ करावा आणि आरामदायी स्थितीमध्ये जावे.
आता वरील आसन विरुद्ध दिशेने करावे. डावे उत्तमांग उजव्या बाजूला झुकवून डाव्या पायाची टाच उजव्या बाजूला जननेंद्रियाजवळ ठेवून उजवा पायाचा पंजा डाव्या गुडघ्याबाहेर ठेवून बाकी सर्व कृति वरील प्रमाणे करावी. दोनही बाजूची आसनांची कृती झाल्यावर अर्धमत्सेद्रिंनाचे एक आवर्तन करावे. ज्यांना वरील आसन करता येणे शक्य नाही त्यांनी वक्रासन अथवा उत्तान वक्रासनाचा सराव करावा. चांगला सराव झाल्यावर अर्ध मत्सेंद्रासनाचे आवर्तन करावे.
आसन कोणी करु नये
1) ज्यांना हर्निया, अल्सर यांचा त्रास आहे त्यांनी हे आसन करु नये.
2) ज्यांना स्पॉन्डीलायटीस, स्लीपडीस्क यासारखे आजार आहेत त्यांनी हे आसन टाळावे.
3) ज्यांना पाठीच्या कण्याची गंभीर दुखणी आहेत त्यांनी पण हे आसन योग्य मार्गदर्शनाखाली करावे.
आसनामुळे मिळणारे लाभ
1) पोट, छाती, पाठ, पाठीच्या कण्याचे स्नायू यांच्यावर पडणारा दाब व ताण यामुळे मज्जातंतू व तेथील स्नायू बळकट होतात. लवचिक होतात व त्यांची कार्यक्षमता वाढते.
2) पोटास पीळ पडल्यामुळे यकृत प्लीहा, स्वादूपींड, जठर, मुत्र पींड, मुत्राशय उदरस्थ, लहान व मोठे आतडे येथील अनावश्यक रक्त संचय नाहीसा होता व त्यामुळे पोटातील सर्व अवयवांचे रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे त्याचे कार्य सुधारते.
3) पोटातील गॅसेस कमी होतात.
4) पोटावरील अनावश्यक मेद कमी होतो.
5) मधूमेहाचे रोग्यास ह्या आसनाच्या सरावामुळे फारच फायदा होतो.
6) स्त्री व पुरुषांच्या लैंगिंक ग्रंथींचे कार्य सुधारते. त्यामुळे उत्साह व स्फूर्ती वाढते.
7) स्त्रीयांचे मासिक पाळीतले दोष कमी होतात.
8) मेरुदंडाचे स्नायू बळकट होतात.
9) मेरुदंडातून बाहेर येणार्या मज्जातंतूंना सुखावह पीळ बसल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते.
10) छातीच्या भागाला चांगला ताण पडल्यामुळे श्वास क्षमता वाढते.
11) मानेच्या वक्रतेमुळे ज्ञानतंतू कार्यक्षम होतात. ज्ञानेंद्रियांचे कार्य सुलभ होते.
आज आपण अर्ध मत्सेंद्रासन कसे करावयाचे ते पाहीले. त्याचे फायदे भरपूर मिळतात. तेव्हा या आसनांचा सराव रोज करावा. जर आसन जमत नसेल तर पुर्वाभ्यास करावा. आपल्या आसनामध्ये जाण्याची हालचाल ही नेहमी हळूवार, लयबद्ध, स्थिरतेने असावी, अभ्यास आपल्या क्षमतेनुसार करावा.
योगशिक्षक प्रदिप घोलकर (फोन- 9869433790)