नवी मुंबईत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी मुंबई : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी, माथाडी कामगार व वाहतूकदारही सहभागी झाले होते. पाचही मार्केट पूर्णपणे बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारने नवीन कृषी व कामगार कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नवी मुंबईत विविध ठिकाणी राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी आंदोलनात सहभागी होऊन बंदला पाठिंबा दिला. बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या नोड व ग्रामीण झोपडपट्टी भागातील दैनंदिन व्यवहार सुरुळीत सुरू होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला, फळ, कांदा, मसाला व धान्य मार्केटमधील सर्व व्यापारी संघटना, माथाडी कामगार व वाहतूूकदारांच्या सर्व संघटनांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनच्या वतीने माथाडी भवनसमोर छोटी सभा घेऊन केंद्र सरकारच्या कायद्यांना विरोध दर्शविला. यावेळी माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, एकनाथ जाधव व इतर कामगार नेते उपस्थित होते. बंदमुळे दिवसभरात बाजारसमितीमधील 25 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. बाजार समितीसह बाहेरील वाहतूकदारही मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाले होते. यामुळे ट्रक टर्मिनलसह रोडवरही ट्रक उभे केले होते. तर, पनवेलसह नवी मुंबईमधील शीख बांधवांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन मोटारसायकल व कार रॅलीचे आयोजन केले होते. नरिमन पॉइंट येथे जाण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी मानखुर्दजवळ रोखले. आंदोलकांनी काही वेळ महामार्ग रोखला. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला सुप्रीम कौन्सिल गुरुद्वारा नवी मुंबई आणि पंजाबी असोसिएशनच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला. वाशी टोल नाक्यावर मानवी साखळी तयार करून ‘शेतकरी बचाव’च्या घोषणा देण्यात आल्या. शासनाने बदल केलेले विधेयक रद्द करावे आणि शेतकर्यांना वाचवावे, अशा घोषणा देत टोल नाक्यावरून पनवेलच्या दिशेने मानवी साखळी तयार करण्यात आली होती. आंदोलकांनी विविध फलक हातात धरून केंद्र शासनाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी कायद्याचा निषेध करीत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने बदल केलेल्या कृषी कायद्याविरोधात नाराजी व्यक्त करीत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला, तसेच घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते व नेरुळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ सेक्टर 2 येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्राने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाची प्रत जाळण्यात आली.