प्रलंबित ई चलानच्या दंडाची रक्कम त्वरित भरा

नवी मुंबई वाहतुक विभागाचे वाहनधारकांना आवाहन

नवी मुंबई ः संपुर्ण राज्यात ‘वन स्टेट वन ई-चलान’ अभियानांतर्गत ‘महाट्रॅफिक अ‍ॅप’देखील विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाहनचालक कोणत्याही शहरातून दंडाची रक्कम थेट ऑनलाइन अदा करू शकतो. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गतही ई चलान चालु करण्यात आले आहे. मात्र काही वाहनधारक ई चलानचे पैसे वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम त्वरीत भरण्याचे आवाहन नवी मुंबई वाहतुक विभागामार्फत करण्यात आले आहे.  

बेशिस्त चालकांना शिस्त लागावी, त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक शाखेकडून बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईदरम्यान वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये वादविवादही अनेकदा घडतो. वादविवादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हायटेक होत स्मार्ट पर्याय शोधला असून ‘ई-चलान’ पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार बेशिस्त वाहनचालकांनी ज्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल त्याचा उल्लेख करून त्या वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार दंडाच्या रकमेची पावती थेट घरपोच पाठविली जाते. मात्र अनेकदा वाहनाचालकांच्या पत्त्यांमधील त्रुटींमुळे किंवा वाहनचालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दंडाची रक्कम भरली जात नाही. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलीस प्रशासनाने त्याच्यापुढे एक पाऊल टाकले आहे. वन ई-चलानप्रमाणे वन अ‍ॅप राज्यस्तरावर विकसीत करण्यात आले आहे. ‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट ऑनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येते. मात्र तरीही काही वाहनधारक दंडाची रक्कम भरत नाहीत. कारवाईचा दंड वाहनधारकांनी भरणे आवश्यक आहे त्यामुळे नवी मुंबई वाहतुक विभागाकडुन दंडाची रक्कम वसुल करण्याबाबत विशेष मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी आपल्या वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम त्वरीत भरुन सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई वाहतुक विभागाने केले आहे.