विघ्नकर्त्यांना डावलून पुनर्विकासाचा श्रीगणेशा

चार गृहनिर्माण संस्थातील 587 सदनिकाधारकांची स्वप्नपूर्ती
नवी मुंबई ः ओळख निश्चित समितीने बुधवारी 16 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत चार गृहनिर्माण संस्थांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे 31 इमारतींमध्ये राहणार्या 587 सदनिकाधारकांना पुनर्विकासात नवीन सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली 20 वर्षे लढा देणार्या या सदनिकाधारकांना अखेर न्याय मिळाला असून विघ्नहर्त्यांना डावलून पुनर्विकासाचा श्रीगणेशा झाल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.
धोकादायक इमारत जाहीर करण्यासाठी पालिकेने विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत नेमलेल्या ओळख निश्चित समितीने चार गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव बुधवारी मंजुर केले आहेत. या समितीचे अध्यक्ष आयुक्त अभिजीत बांगर असून सिडकोचे मुख्य नियोजनकार, मुख्य अभियंता, पालिकेचे शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता व सहसंचालक नगररचना कोकण भवन हे सदस्य आहेत. पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींना परिक्षणानंतर धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब करण्याचे अधिकार या समितीला असून त्यानंतरच पुनर्विकासाच्या बांधकाम परवानगीला पालिकेच्या नगररचना विभागाकडून मान्यता मिळते.
वाशी येथील बी-3 टाईप इमारतींची नेवस्थी गृहनिर्माण संस्था, सेक्टर 9,10 येथील लिटील फ्लॉवर गृहनिर्माण संस्था व उत्कर्ष गृहनिर्माण संस्था तसेच नेरुळ येथील पंचशील गृहनिर्माण संस्था यांचे प्रस्ताव वरील समितीकडे गेले वर्षभर पडून होते. मध्यंतरी कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन असल्याने संबंधित समितीची बैठक घेण्यात आली नव्हती. यापुर्वी या समितीने वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा व एकता गृहनिर्माण संस्था यांना मंजुरी दिली असून त्यांचे बांधकाम परवानगीचे काम प्रगतीपथावर आहे. नेरुळ येथील दत्तगुरु गृहनिर्माण संस्थेला या समितीच्या मंजुरीनंतर संबंधित संस्थेने आवश्यक त्या परवानग्या मिळविल्यानंतर नगररचना विभागाने गेल्या आठवड्यात बांधकाम परवानगी दिली आहे. या समितीने जरी वरील गृहनिर्माण संस्थांना मंजुरी दिली असली तरी त्यांना सिडकोचा ना हरकत दाखला, विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला, हायराईज समितीची मंजुरी तसेच सीआरझेड समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. हे दाखले आज ना उद्या मिळतील परंतु वरील समितीकडून संबंधित इमारती धोकादायक म्हणून शिक्कामोर्तब होणे गरजेचे असल्याचे मत सबंधित प्रकल्पाचे वास्तुविशारद यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना सांगितले.
या धोकादायक इमारतीत राहणार्या रहिवाशांच्या भावना अति तीव्र असून या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. गेली दहा वर्ष आम्ही जिव मुठित घेऊन या इमारतीत राहत असून अनेक विघ्नकर्त्यांच्या अडथळ्यांमुळे पुनर्विकासास चालना न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुनर्विकासासाठी लागणारा पहिला मोठा टप्पा आपण आता पार केला असून भविष्यात लागणार्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करण्यात येईल अशी शाश्वती तेथील संस्थेच्या पदाधिकार्यांनी दिली. अनेक वर्षांनी का होईना पुनर्विकासाचा श्रीगणेशा झाल्याने त्यांनी पालिका आयुक्तांना धन्यवाद दिले.
पुनर्विकासासाठी लागणार्या परवानग्या
- सिडकोचा ना हरकत दाखला
- विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला
- हायराईज समितीची मंजुरी
- सीआरझेड विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
- पर्यावरण व फ्लेमिंगो प्राधिकरणाची मंजुरी
- अग्निशमन विभागाची परवानगी
- विकासकाला सिडकोला वाढीव चटई क्षेत्रापोटी शुल्क तसेच रहिवाशांना भाडे, कॉर्पस फंड, अतिरिक्त चटईक्षेत्र द्यावे लागणार