तणावमुक्ती आणि योग

लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने लहान थोर प्रत्येक व्यक्तीवर तणाव वाढत चालला आहे. त्यामुळे अॅक्सायटी डिप्रेशन, बी.पी, मधुमेह, डोकेदुखी, सर्दी, झोप न येणे असे बरेच आजार वाढत चालले आहेत. काम बंद असल्यामुळे अर्थाजन कमी त्यात डॉक्टरांची बिले वाढत आहेत. अशा परिस्थितीत तणावमुक्त जीवन जगणे फारच अवघड होऊन बसले आहे. जर तणाव वाढला तर प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोरोनासारखे विषाणू आपल्या शरिरामध्ये चोरपावलाने शिरुन पटकन आपले बस्तान मांडतात व फुफ्फुसातील ग्रंथीमध्ये जाऊन शरिराचे आरोग्य बिघडवतात. त्यामुळे हा आजार वाढत जातो. आज आपण तणाव मुक्तीसाठी योग साधना कशी करावी या विषयीचा अभ्यास करणार आहोत.
पहिल्यांदा आपण तणाव म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेऊया. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपण ठरवितो एक आणि घडते दुसरेच अशी परिस्थिती ज्यावेळेला येते त्यावेळेला तणाव येतो. माणूस दुःखी होतो अशावेळी निरनिराळे आजार शरिरात जाऊन घर करतात व ते लवकर निघत नाहीत.
तणावाचे प्रकार
1) शारिरीक तणाव
2) मानसिक तणाव
3) सामायिक तणाव
तणावाची कारणे
सामान्य अथवा नोकरदार माणसाला अर्थप्राप्ती कमी असल्यामुळे कुंटुंब चालविणे कठिण जाते, मुलांची फी, कपडे, बायकोचे वागणे किंवा ऑफीसमध्ये बॉसशी भांड झाले तर सामान्य माणूस घरी येऊन तणावाखाली राहतो. चिडचिडा होतो. त्यामुळे घरचे वातावरण कलुषित होते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत परिक्षेत नापास झाला, कमी मार्क्स मिळाले की तणाव वाढतो. मनासारखा अभ्यास नाही झाला तरीही तणाव येतो. आपल्याला पाहिजे त्या विषयात प्रवेश नाही मिळाला, मनासारखी साथ मिळाली नाही तरी तणाव वाढतो. आपल्या बरोबरच्या विद्यार्थ्यांचे राहणे आणि आपले राहणे यामध्ये सातत्याने तुलना करायला आवडते व त्यात आपल्या मित्राला मिळणार्या सुविधा म्हणजे स्कुटर, महागडा मोबाईल फोन आपल्याकडे नाही यातून तणाव वाढतो. अशा बर्याचशा छोट्या मोठ्या गोष्टीमुळे तणाव वाढतो व तो कमी करणेसाठी सीगरेट, मदीरा यासारख्या सवयीच्या आहारी जातो. सध्या धंदेवाल्यांचा धंदा बंद आहे. हातातील चलन गायब झाले की तणाव वाढतो. आपणास पाहिजे तसा फायदा मिळाला नाही तरी तणाव वाढतो.
असे बर्याच प्रकारे डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, सर्व क्षेत्रात काम करणार्या मनुष्याला तणाव निर्माण होतो. तसेच माणसाला तणाव निर्माण होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कमकुवत मन. मन कमकुवत असेल तर शरिर साथ देत नाही. मन हे फारच चंचल असते. पण ते कोणतीही गोष्ट साध्य करुन शकते.
आज आपण प्राणधारणाबद्दल जाणून घेऊ
प्राणधारणा करण्यासाठी कोणत्याही बैठक स्थितीत आसनामध्ये बसावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा. दोनही हात गुडघ्यावर ठेवावे. हनुवटी जमिनाला समांतर असावी. डोळे शिथील ठेवावे. चेहर्याचे स्नायू शिथील असावे. श्वास प्रश्वास नैसर्गिक असावा. आता डोळे मिटावेत आणि भटकणार्या मनाला श्वासावर केंद्रित करावे व श्वासाची हालचाल जाणून घ्यावी.
प्राणधारणा प्रथम
आता हळुहळु नैसर्गिक श्वसनाचा घेणारा श्वास आणि बाहरे जाणारा श्वास असे 1 संबोधावे आणि कमीतकमी 15 वेळा ही कृती करावी. हे एक आवर्तन झाले. अशी दोन तीन आवर्तने करावीत.
प्राणधारणा द्वितीया
आता प्राणधारणा प्रथम मधून प्राणधारणा द्वितीयामध्ये जावे. आतमध्ये येणारा श्वास व बाहेर जाणारा श्वास याचा स्पर्श नाकाच्या आतील भींतीला कसा होतो हे जाणून घ्यावे. याचे 15 श्वासापर्यंत सराव करावा. यातून बाहेर येताना पहिल्यांदा प्राणधारणा द्वितीया मधून प्रथमामध्ये यावे व नंतर हळुवारपणे डोळे उघडावे व प्राणधारणेतून बाहेर यावे. याची सकाळी व रात्री तीन आवर्तने करावी. असे एक-दोन आठवडे करावे.
प्राणधारणेपासून मिळणारे फायदे
- मनाची एकाग्रता वाढते
- मनाची दुर्बलता हळूहळू कमी होते.
- मन शक्तीशाली झाल्यामुळे मनोकायिक आजार कमी होतात.
- हार्मोनल बॅलेन्स होते.
- प्रतिकारशक्ती वाढते
- मनाची सकारात्मक वृत्ती वाढते, मनाची चंचलता कमी होते.
- मन शांत व बलवान होते.
योगशिक्षक- प्रदिप घोलकर, 9869433790