61 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून अडीच लाख रोजगारनिर्मिती

25 भारतीय कंपन्यांशी सामंजस्य करार
मुंबई ः कोरोनाकाळातही देशातील नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाच्या वतीने 25 भारतीय कंपन्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत 61 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून 2 लाख 53 हजार 880 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करुन महाराष्ट्राने मागील वर्षभरात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत करोनाकाळात एक लाख बारा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. करोनाचे संकट असतानाही राज्याच्या उद्योग विभागाने कमी कालावधीत दोन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हा समाधान, अभिमान वाटेल असा क्षण आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री देसाई आणि त्यांच्या विभागातील अधिकार्यांचे अभिनंदन केले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0’अंतर्गत उद्योग करारांचा हा तिसरा टप्पा आहे. विशेष बाब म्हणजे करार करण्यात आलेल्या सर्व कंपन्या भारतातील आहेत. राज्यात गुंतवणूक करण्याची उद्योजकांची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. यापूर्वी 29 करार झाले आहेत. त्यापैकी 21 उद्योजकांना उद्योगांसाठी जमिनी दिल्या आहेत. प्रत्यक्ष गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रत्येक उद्योगासाठी रिलेशन मॅनेजरची नियुक्ती केली आहे. रोजगार वाढावा, गुंतवणूक यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. करार करण्यात आलेल्या कंपन्यांना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. राज्याच्या सर्व भागांचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने जून, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. हे करार पूर्णत्वास येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. महापरवानामुळे 21 दिवसांत परवाना दिला जात आहेत. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. महाजॉब्जमुळे उद्योग आणि नोकरी मागणार्यामध्ये दुवा म्हणून काम शासन काम करत आहे. सेवा, उद्योजकांना औद्योगिक सुविधा पुरवण्यावर अधिक भर आहे.
उद्योजक सज्जन जिंदाल म्हणाले, महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे विशेष प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मॅग्नेटिक’ आहे. संपूर्ण जग या ठिकाणी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. जिंदाल समूहाच्या 10 कंपन्या महाराष्ट्रात काम करतात. जवळपास 1 हजार कोटींची गुंतवणूक यामध्ये केलेली आहे. रायगड जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा स्टील कारखाना सुरू करण्याचा मनस आहे. चार कोटी टन क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे.’’
कंपन्यांची यादी आणि गुंतवणूक
कंपनी क्षेत्र गुंतवणूक(कोटी) रोजगार ठिकाण