Breaking News
आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
नवी मुंबई ः ब्रिटन आणि काही इतर देशांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आल्याने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना सावध रहावे अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विशेष वेबसंवादाव्दारे दिल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने सर्व नोडल ऑफिसर, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि सर्व रूग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकार्यांशी वेबसंवाद साधत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वा. पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याचे काटेकोर पालन व्हावे याकरिता हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब यांना पोलीसांप्रमाणेच महानगरपालिकेमार्फतही लेखी सूचना देण्यात याव्यात असे आदेश देत याचे उल्लंघन करणार्यांवर पोलीसांच्या मदतीने कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. जे नागरिक बेजबादारपणे सुरक्षा नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावरील कारवाई अधिक प्रभावीरित्या राबविण्याचेही निर्देश विभाग अधिकारी यांना देण्यात आले.
ब्रिटनवरून येणार्या प्रवाशांवर काटेकोर लक्ष ठेवण्याचे काम आपल्याला करायचे असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी आणि विभाग अधिकारी यांना दिले. परदेशातून प्रवास करून येणार्या प्रवाशांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि विमानतळ प्रशासन यांचेकडून प्राप्त केली जाणार असून आयसीएमआर च्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. इतर देशांमधून येणार्या प्रवाशांशी कॉल सेंटरच्या माध्यमातून नियमित संपर्क ठेवला जाणार असून त्यांच्यामध्ये कोव्हीड सदृष्य लक्षणे दिसून येत आहेत काय यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार सध्या दररोज 3 हजाराच्या आसपास असलेले कोव्हीड 19 टेस्टींगचे प्रमाण अधिक वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामध्ये विशेषत्वाने आरटी-पीसीआर टेस्ट वाढविण्याचे सूचित करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai