उरणमध्ये गॅस टँकरला अपघात

रात्री उशिरा गॅस गळती रोखण्यास जवानांना यश

उरण : उरण तालुक्यातून चिरनेर मार्गे मुंबई-गोवा महामार्गावरील पेणकडे येणार्‍या रस्त्यावर एलपीजी गॅस टँकरला बुधवारी संध्याकाळी अपघात झाला. त्यानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत होती. अखेर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना टँकरमधून होणार्‍या गॅस गळतीवर रात्री उशिरा नयंत्रण मिळवण्यात यश आले. 

23 डिसेंबर रोजी संध्याकाळी उशिरा 8 वाजताच्या दरम्यान उरणहून अलिबागला येणारा एलपीजी गॅस टँकर अवघड वळणावर पलटी झाला. काही वेळानंतर सदर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागल्यावर चिरनेर-दिघोडे गावाजवळील साधारण 30 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.

उरण परिसरातील तीन अग्निशमन दल, तालुका पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस, नवीन पनवेल वाहतूक पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वेगाने मदतकार्य सुरू केले. तसेच चिरनेर ते खारपाडा मार्गावर टँकर पलटी होऊन गळती सुरू झाल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. सुमारे 4 तासांपासून अधिक काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.  पोलीस आणि अग्निशमन दलाचे गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न केले. अखेर रात्री उशिरा चिरनेर खिंडीत झालेल्या टँकरमधून होणार्‍या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. उरण येथील बीपीसीएल कंपनीतील तज्ज्ञांच्या टीमला पाचारण करण्यात आले असून, गॅस गळती आटोक्यात आलीय. तसेच फायर ब्रिगेडच्या टीमने गॅस गळती होणार्‍या टँकरवर सतत पाण्याच्या फवार्‍याचा मारा करून टँकर कूलिंग करण्याचे काम केले.