01 जानेवारीपासून स्थानिकांना टोलमध्ये सूट

धडक मोर्चामुळे टोलनाका प्रशासन नरमले
पनवेल ः पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्स्पोर्टच्या छोट्या मोठ्या वाहनांना स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून सोमवारी(दि.28) धडक मोर्चा काढण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चामुळे आयआरबी टोलनाका प्रशासन नरमले असून 01 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
स्थानिकांनी वारंवार मागणी करुनही त्याची दखल टोल प्रशासनाद्वारे घेतली जात नव्हती. अखेर त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाची तीव्रता पाहून पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता. या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान आयआरबी टोलनाका प्रशासनाकडून चर्चेसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाना आमंत्रित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत टोल नाक्यावरून रोहींजण परिसरातील स्थानिक चालक मालक नोंदणीकृत संघटनेच्या सभासदांची माल वाहतूक वाहने विनाशुल्क वाहतूक करीत होती. परंतु सध्या संस्थेच्या वाहनांना टोल आकारले जात असल्याने त्यांना टोलमाफी द्यावी, अशी आग्रही मागणी आ.प्रशांत ठाकूर यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचेही नमूद केले. यावेळी प्रशासनाने त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या वाहनांना 01 जानेवारी 2021 पासून टोलमध्ये सूट देण्याचे मान्य केले. तसेच यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी या टोलनाक्यावर काम करणार्या कर्मचार्यांच्या पगारासंदर्भात विषय मांडून त्यांना कमी पगारावर काम करावे लागत असल्याने त्यांना किमान वेतन 15 हजार रुपये पगार द्यावा, अशी मागणी यावेळी केली आहे.