टोमॅटाचे दर खालावले

नवी मुंबई : वाहतूकदारांचा संप, बुधवारी पुकारण्यात आलेला बंद आणि पावसामुळे कर्नाटकातून कमी आवक झाल्याने टोमॅटोचे दर वाढले होते. मात्र वाहतूकदारांचा संप मिटल्याने टोमॅटोच्या दरात 6 ते 8 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे बंददरम्यान घाऊक बाजारात प्रतिकिलो 26 ते 30 रुपयांना मिळणार्‍या टोमॅटोचे दर शनिवारपासून 22 ते 24 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर किरकोळ बाजारात 40 रुपये प्रति किलो दर आहेत. एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात शनिवारी एकूण 3 हजार 972 क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे. तर 80 गाड्या बाजारात दाखल झाल्या होत्या.

मराठा आंदोलन व वाहतूकदारांच्या संपादरम्यान घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात 8 ते 10 रुपयांनी वाढ झाली होती. घाऊक बाजारात टोमॅटोचा प्रतिकिलो दर 30 ते 32 रुपयांवर गेला होता. त्यामुळे किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये प्रति किलो टोमॅटो विकला जात होता. वाशी बाजारात पुणे, नाशिक आणि बंगळूरू येथून टोमॅटोची आवक होत असते. पावसाळ्यात साधारण टोमॅटोच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यामुळे थोडी घट असते. त्यात बंददरम्यान किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होणार टोमॅटो दोन दिवसांपासून आवक वाढल्याने 10 ते 20 रुपयांची घसरण होऊन 40 रुपयांवर पोहोचला आहे.