रोहन तोडकर मृत्यूप्रकरणी एकाला अटक

नवी मुंबई  ः मराठा समाजाच्यावतीने 25जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या नवी मुंबई बंद आंदोलनादरम्यान, उसळलेल्या दंगलीमध्ये रोहन तोडकर या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरोधात हत्येसह दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून सोमवारी रात्री संतोष डावरे (23) या तरुणाला कोपरखैरणे गावातून अटक केली आहे. 

मोर्चावेळी काही समजाकंटकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोहन तोडकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरोधात हत्या तसेच दंगलीचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. मात्र या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-एकने दंगलीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंची तपासणी करून आरोपींची धरपकड सुरू केली. गुन्हे शाखेने केलेल्या तपासणीत कोपरखैरणे गावात राहणार्‍या डावरे या तरुणाचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी सोमवारी त्याला हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले.