Breaking News
पुणे : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे एसटी आगाराने सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीसांच्या सुचनेनुसार प्रवाशांची सुरक्षा आणि एसटीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी तसचं एसटीने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
पुण्यात आज बंदच्या निमित्तानं सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर तिकडे औरंगाबादमध्येही जनजीवन पूर्णपणे ठप्प आहे. आगारातून एकही एसटी सुटलेली नाही. शाळा, महाविद्यालयं आधीच बंद ठेवण्यात आले आहेत. मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पवारांच्या घराबाहेर ठिय्या
आंदोलकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आंदोलनाची धग वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते आंदोलकांना जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अमित देशमुख लातूरमध्ये थेट मराठा आंदोलकांमध्ये सामील झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाच्या मागणीला समर्थन दिले आहे.
पालघर आणि नंदुरबारमधील बंद मागे
दरम्यान, आज सकाळपासून राज्यभरात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. आंदोलकांनी मुंबई-गोवा, मुंबई-आग्रा हे दोन महामार्ग रोखून धरले. तर हिंगोलीत आंदोलकांनी एक स्कूल व्हॅन जाळल्याची घटना घडली. हा अपवाद वगळता अन्य ठिकाणी मोर्चेकरी ठिय्या आंदोलन करुन रस्ते वाहतूक बंद करताना दिसत आहेत. मुंबईत अजूनपर्यंत या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मुंबईतील रेल्वे आणि बेस्ट सेवा सुरळीतपणे सुरु आहेत. मात्र, पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai