एपीएमसीतील 285 गाळ्यांचा प्रश्न मार्गी

आ. मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश ः भूमिपुजन संपन्न

नवी मुंबई : वाशी नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय करण्याकरिता 285 गाळ्यांचा 9 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आ. मंदा म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. सदर 285 गाळ्यांचा बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिरिक्त भाजीपाला आवारात सन 2009 पासून भाजीपाला व्यापार होत नसल्याने तेथील बंद गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आ. मंदा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिली गेली होती. एपीएमसीतील अतिरिक्त भाजीपाला आवारामधील गाळेधारकांना कृषीपूरक शेतमाल विक्रीकरिता परवानगी देण्यासाठी त्यांनी पणन विभाग व शासन दरबारी पाठपुरावा केला होता. अतिरिक्त भाजीपाला आवारातील 285 गाळ्यांमध्ये भाजीपाला व्यवसाय होत नसल्याने गेल्या 9 वर्षापासून हे गाळे बंद होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत होती. या गाळेधारकांनी आ. म्हात्रे यांची भेट घेतली असता त्यानुसार म्हात्रे यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता व संबंधित अधिकार्‍यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी कृषी पूरक व्यवसाय करण्यास परवनागी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येऊन सदर गाळ्यांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. ए.पी.एम.सी. चे प्रशासक व अध्यक्ष सतीश सोनी यांनी आ. मंदा म्हात्रे यांचे आभार मानत सांगितले कि, ताईंच्या कष्टाने या 285 व्यापार्‍यांच्या कुटुंबाला आधार मिळाला असून आज ताईंच्या हस्ते जसे बांधकामाचे भूमिपूजन झाले आहे, तसेच येत्या 4 महिन्यात सदर गाळे तयार करून या संपूर्ण 285 गाळ्यांचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.   

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय आता करण्यात येणार असल्याने व्यापार्‍यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे.