विस्तारित गावठाणांचे लवकरच सर्वेक्षण

   आमदार मंदा म्हात्रे यांची शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी समवेत बैठक 

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्राधिकरण क्षेत्रातील विस्तारित गावठाणांचाही सिटी सर्व्हेक्षण होणे जरुरी आहे. सदर सर्वेक्षण लवकरात लवकर सुरु करण्यात येणेबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले. नार्वेकर यांनी याबाबत सकारात्मक पवित्रा घेत येत्या 15 दिवसांत नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण सुरु करण्याचे आश्वासन दिले.  

गावठाण व विस्तारित गावठाणाचे नगरभूमापन (सिटी सर्व्हे) तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आले असताना महापालिका व सिडको फक्त मूळ गावठाणांचे सिटी सर्व्हे करीत आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाणा बरोबरच विस्तारित गावठाणाचेही सिटी सर्वेक्षण व्हावे याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांजबरोबर बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री सचिवालयाच्या आदेशानुसार विस्तारित गावठाणांचाही सिटी सर्व्हेक्षण होणे जरुरी आहे. सदर सर्वेक्षण लवकरात लवकर सुरु करण्यात येणेबाबत आ. म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले. यावेळी राजेश नार्वेकर यांनीही सदरबाबत सकारात्मक पवित्रा घेत येत्या 15 दिवसांत नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्वेक्षण सुरु करण्याचे आश्वासन दिले.  

यावेळी म्हात्रे यांनी सांगितले कि, 4 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री यांचे मुख्य प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांजबरोबर नवी मुंबई क्षेत्रातील मूळ गावठाण व विस्तारित गावठाण यांचे सिटी सर्वेक्षण लवकरात लवकर करणे तसेच प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणेसंदर्भात बैठक पार पडली होती. सदर बैठकीत मूळ गावठाण व विस्तारित गावठाणांचा सिटी सर्व्हे तातडीने करण्याचे आदेश नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्राधिकरणास देण्यात आले होते. त्यांना विशिष्ट मुदतही देण्यात आली होती. परंतु 4 महिने उलटल्यानंतरही महापालिका फक्त मुळ गावठाणांचेच सिटी सर्वेक्षण करीत आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे सर्वच विषय माझे जिव्हाळ्याचे असून त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, त्यांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे नियमित व्हावी, त्यांना सर्व सुखसुविधा मिळाव्या याकरिता नेहमी शासन दरबारी लढणार असल्याचे आ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.