14 ते 18 वयोगटातील बेपत्ता मुलींचे प्रमाण जास्त

नवी मुंबई ः दिवसेदिवस अल्पवयीन मुला-मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे.यामध्ये 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे माहिती समोर आली आहे. 

हातात आलेला मोबाइल आणि त्यातून इंटरनेटच्या माध्यमातून खुले होणारे जग यामुळे मुलांचा आणि पालकांचा संवाद हरवत चालला आहे आणि बाहेरचे जग त्यांना जवळचे वाटू लागले आहे. त्यामुळे आईवडील ओरडले की मुले थेट घर सोडून जात असल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढू लागले आहेत. सरकारच्या नवीन परिपत्रकानुसार 18 वर्षे वयोगटाखालील मुला-मुलींच्या हरवल्याच्या तक्रारींची नोंद सध्या ’अपहरणा’च्या अंतर्गत नोंदविली जात आहे. यानुसार जानेवारी ते डिसेंबर 2017 या वर्षात अपहरणाचे एकूण 270 गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत नोंदवले गेले आहेत. यामध्ये मुलांची संख्या 99 असून 171 मुली आहेत. 99 मुलांपैकी 93 मुलांचा शोध घेण्यात यश आले असून केवळ सहा मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. तर, 2018 या चालू वर्षातील ऑगस्ट महिन्यापर्यंत 231 अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत झाली आहे. यात 62 मुले असून 143 मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली आहे. यात 53 मुलांचा छडा लागला असून नऊ मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. तर, 169 मुलींपैकी 143 मुलींचा शोध लागला असला तरी 26 मुली अजूनही बेपत्ता आहेत.

या दोन वर्षांतील मुलींच्या अपहरण झाल्याच्या प्रकरणांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. मात्र याबाबत माहिती घेतली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

यातील 14 ते 18 वर्षांखालील मुलींच्या केसेस अधिक आहेत. मात्र यातील 70 ते 80 टक्के मुली या स्वत:हून घरातून निघून गेल्या आहेत. अभ्यास केला नाही, आई-वडील ओरडले, मित्राशी-मुलाशी बोलू नको, असे आई वडिलांनी सांगितले किंवा प्रेम प्रकरणाला आई वडिलांचा विरोध यामुळे घर सोडून जाणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. यात मुलींचे प्रमाण अधिक आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दर महिन्याला हरवलेल्या, घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलांची संख्या दिवसेन्दिवस वाढत आहे.