अनधिकृत फेरीवाले व मार्जीनल स्पेसवर कारवाई

नवी मुंबई ः नवी मुंबईतील बेलापूर ते दिघा अशा सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले व मार्जीनल स्पेसवर धडक कारवाई हाती घेण्यात आली असून एकूण 127 अनधिकृत फेरीवाल्यांवर व 228 मार्जीनल स्पेसवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान एकूण रक्कम रु. 8 लक्ष 8 हजार दोनशे इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.

पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, मार्जीनल स्पेसचा गैरवापर, पदपथ व रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले यावर सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार धडक कारवाई करण्यात येत आहे. तथापि स्थायी समिती सभेत अनधिकृत फेरीवाले व मार्जीनल स्पेसमध्ये व्यवसाय करणार्‍या गाळे धारकांवर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पालिका क्षेत्रातील पदपथ व रस्ते नागरिकांना चालण्यासाठी व वाहतुकीसाठी खुले असावेत ही महानगरपालिकेची भूमिका असून त्यादृष्टीने त्याठिकाणी वाहतुकीस व रहदारीस अडथळा आणणा-या अनधिकृत फेरीवाल्यांवर व मार्जीनल स्पेसमध्ये व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे.