कंडोमिनियमअंतर्गत नागरी सुविधांच्या कामांना मंजूरी

आ. संदीप नाईक यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई ः माथाडी, बेस्ट कामगार तसेच श्रमिकांच्या सिडकोनिर्मिती सर्व वसाहती कंडोमिनियम अंतर्गत नागरी सुविधांची कामे नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून सुरु व्हावीत, यासाठी आ.संदीप नाईक गेली अनेक वर्षे सातत्याने शासनाच्या मंजूरीसाठी पाठपुरावा करीत होते. गुरुवारी अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कंडोमिनियमअंतर्गत कामे सुरु करण्यासाठी पालिकेने जो परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे त्याला शासनाने तात्काळ मंजूरी द्यावी अशी मागणी विधीमंडळात अधिवेशनात आ. नाईक यांनी केली असता नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी त्याला होकार दर्शविला.

नवी मुंबईत सिडकोने वाशी, कोपरखैरणे, घणसोली इत्यादी ठिकाणी अल्प, मध्यम अशा विविध उत्पन्न गटांसाठी सदनिका बांधल्या. या वसाहती 30 ते 40 वर्षांच्या झाल्यानंतर  त्यामधील मलनिस्सारण वाहिन्या, जल वाहिन्या जुन्या आणि नादुरुस्त झाल्या आहेत. गटारे, पदपथ, चौकांची दुरावस्था झाली आहे. मात्र या वसाहतींमधून राहणार्‍या रहिवाशांची आर्थिक क्षमता नसल्याने या सुविधांच्या  दुरुस्तीची किंवा त्या नव्याने निर्माण करण्याची कामे ते करु शकत नाहीत. विशेषतः पावसाळयात या वसाहतींमधून पाणी तुंबून डासांची पैदास होते आणि डेंग्यू आणि मलेरियासारख्या जीवघेण्या रोगांचा फैलाव होत असतो. त्यामुळे या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ही बाब आमदार नाईक यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. 2015 पासून आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, नगरविकास खात्याचे प्रधान सचिवांकडे कंडोमिनियम अंतर्गत कामांस मंजूरी मिळावी, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. या शिवाय विधीमंडळाच्या अधिवेशनांमधून तारांकीत प्रश्न, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, औचित्याचा मुददा या संसदीय आयुधांचा वापर करुन या विषयाला विधानसभेत वाचा फोडली आहे. आ.नाईक म्हणाले की, नवी मुंबई महापालिका या वसाहतींमध्ये नागरी सुविधांची कामे करण्यास तयार आहे. यापूर्वी 80 टक्के कामे पालिकेने पूर्ण केली आहेत केवळ 20 टक्के कामे बाकी आहेत. त्यानंतर शासनाने या कामांवर बंदी आणली. हा एक प्रकारे कंडोमिनियममधून राहणार्या हजारो नागरिकांवर अन्यायच आहे. ही कामे करण्यासाठी पालिकेने शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी मागितलेला नाही तसेच ही कामे करण्यास मंजूरी मिळावी यासाठी शासनाकडे चांगला व परिपूर्ण प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी द्यावी जेणेेकरुन ही कामे येत्या महिनाभरात सुरु करता येतील, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली. नाईक यांच्या मागणीवर नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी होकार दर्शविला. त्यामुळे आता सिडको निर्मित सर्व वसाहती कंडोमिनियम अंतर्गत नागरी कामांना लवकरच सुरुवात होणार असून या सर्व वसाहतींमधून राहणार्‍या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.