जैवविविधता पाहणीसाठी विद्यार्थ्यांना सूट

पालिका शालेय विद्यार्थ्यांना वनविभाग देणार मोफत बससेवा

नवी मुंबई : ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. अनेक जण येथे भेट द्यायला येतात. सध्या फ्लेमिंगोच्या आगमनामुळे येथे बोटीतून खाडीसफर सुरू झाली आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सागरी जैवविविधतेची अधिक माहिती करून देण्यासाठी वनविभागाच्या वतीने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

26 किलोमीटरच्या खाडी परिसरात 200 हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनार्‍यावर दरवर्षी आश्रयाला येतात. खाडीतील विविध प्रकारच्या जैवविविधतेची माहिती आणि खाडीकिनार्‍यांचे महत्त्व, किनार्‍यांचे संरक्षण कसे करावे, पक्षिनिरीक्षक आणि पर्यावरण यांची माहिती होण्यासाठी या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना ही सफर घडविण्यात येणार आहे.

वनविभागाच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या या केंद्रात परदेशी विद्यार्थीही पर्यटक म्हणून दाखल होत आहेत, तसेच शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पक्षिनिरीक्षणासाठी येत आहेत. मात्र, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या त्या प्रमाणात कमी असल्याने या विद्यार्थ्यांनाही यात सामावून घेण्यासाठी ही नि:शुल्क बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍यांनी दिली. या केंद्रात शालेय विद्यार्थ्यांना सागरी पट्टा, कांदळवन, इतर जैवविविधतेची माहिती देण्यासाठी संग्रहालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याकरिता खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 25 प्रवेश शुल्क भरून प्रवेश दिला जातो, तर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत प्रवेश दिला जातो. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्यापक स्वरूपात सामावून घेण्यासाठी वनविभाग आता मोफत बससेवा पुरविणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सीएसआर निधीतून भाड्याने बस घेण्याचे नियोजन असून ते शासनाच्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यानंतर वनविभाग स्वत: बस खरेदी करणार असल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍यांनी दिली. नवी मुंबईसह ठाणे, मुंबई महापालिका शिक्षण विभागाला तसे पत्र दिले असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.