मेट्रो कारशेड पाठोपाठ बुलेटलाही ब्रेक?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सर्व विकास कामांची माहिती मागवल्याचं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच ’राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढून वास्तव जनतेसमोर ठेवले जाणार आहे. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, त्यांची सध्या असलेली आवश्यकता, त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले. त्यामुळे आता आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बुलेट ट्रेनला स्थगिती देणार का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

बुलेट ट्रेनला महाराष्ट्रातील डहाणू आणि पालघरमधील लोकांचा विरोध आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केल्यानुसार, शिवसेना कोणत्याच विकास कामांमध्ये अडथळा बनणार नाही. परंतु, जर एखाद्या प्रकल्पासाठी जनतेचा विरोध असेल, तसेच एखादं विकास काम जनहिताच्या विरोधात असेल तर मात्र त्यावर पुर्नविचार करुन आपला निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. पण गेल्या वर्षभरात पालघर जिल्ह्यात शंभरपेक्षा जास्त भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. काही धक्के 4.5 एवढ्या रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे होते. तसेच बुलेट ट्रेन ही मोदी सरकारच्या यांच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश

मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2646 झाडे तोडण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. राज्यात सरकार आल्यास आरेला जंगल घोषीत करण्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी मेट्रोचे काम सुरु असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.