राज्यातील प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्री भाजप सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेत आहेत. या बैठकीत राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरु आहेत? या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे? त्यावर आतापर्यंत किती खर्च झाला आहे? कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं गरजेचं आहे? याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. 

नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात. या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेत असतात. त्यात नवीन असं काही नाही. प्रकल्पांसाठी किती खर्च येणार आहे? यावर पूर्ण अहवाल येईल, त्यावर विचारविनिमय होईल,’ असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही, पण जे प्रकल्प सुरु आहेत, त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली आहे. कोणताही प्रकल्प थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही,’ असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जागतिक दर्जाचे मत्स्यालय लवकरच मुंबईत 

मुंबईत लवकरच परदेशातील सिम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभं राहण्याची शक्यता आहे. यासंबंधी पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीबद्दल माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने बँकॉक इथल्या सिम ओशन वर्ल्ड’च्या धर्तीवर मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पर्यटन विभागाला दिल्या, असं माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयाकडून ट्विट करण्यात आलंय.