कर्नाळा बँक ठेवीदारांचा मोर्चा

विवेक पाटील यांच्या अटकेची मागणी ः कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण 

पनवेल ः 63 बोगस कर्ज प्रकरणे करून, त्यातील 512.50 कोटी रुपये लंपास करणारे आणि जनसामान्यांच्या पैशावर डल्ला मारणारे शेकापचे नेते, माजी आमदार व कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करा, अशी जोरदार मागणी 13 फेब्रुवारीला पनवेलमध्ये हजारो जणांच्या साक्षीने झालेल्या मोर्चात झाली. 

कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत. मात्र, ठेवीदारांना पैसे दिले जात नाही तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेलमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. कर्नाळा बँकेत 512.50 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असतानाही बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत, ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर विसंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळत आहेत. विवेक पाटील यांच्या धोरणामुळे आज अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकरणामुळे ठेवीदार संकटात सापडले असून, त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात तरुणांसह वृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.