नगरसेवकांना स्वेच्छानिधी खर्चास बंदी

नवी मुंबई ः एप्रिल-मेमध्ये होणार्‍या पालिका निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यामुळे 7 फेब्रुवारीपासून नगरसेवकांना स्वेच्छानिधीतून किंवा नगरसेवक निधीतून कामांवर खर्च करता येणार नाही, असे आदेश नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने काढले आहेत. हे आदेश न पाळल्यास ते काम मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केले जात असल्याचे गृहीत धरून कामाला त्वरित स्थगिती दिली जाईल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मे रोजी संपत आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असून तशी तयारी पालिकेने केलेली आहे. मात्र, त्याआधी राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका किंवा पोटनिवडणुकीमध्ये संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून कोणत्याही लोकप्रतिनिधींना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामावर आपल्या स्वेच्छानिधीतून खर्च करता येणार नाही, हे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या आदेशाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कामांवर स्वेच्छानिधी किंवा नगरसेवक निधीतून खर्च करण्यास शनिवारपासून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. नगरसेवकांना कोणत्याही प्रकारच्या नवीन विकासकामांची मंजुरी घेता येणार नाही आणि नवीन कामाला सुरुवातही करता येणार नाही. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाने काढलेल्या या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही पालिका आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना आणि कार्यालयप्रमुखांना दिली आहे.

या गोष्टींवर निर्बंध

या आदेशानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला स्वेच्छानिधीतून कोणत्याही प्रकारचे आश्वासन देता येणार नाही किंवा कोणताही नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी अधिकार्‍यांकडे सादर करता येणार नाही.

7 फेब्रुवारीच्या आधी एखादा प्रस्ताव मंजूर झाला असेल; परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसेल तरीही ते काम सुरू करण्याचे आदेशही संबंधित विभागाने देऊ नयेत किंवा कामालाही सुरुवात करू नये.

जे काम 7 फेब्रुवारीच्या आधी सुरू झाले असेल, ते काम पुढे सुरू ठेवता येऊ शकेल. त्यामुळे सुरू असलेल्या कामांमध्ये अडथळा येणार नाही.