सिडकोची श्री गणेश सोसायटीला नोटीस

करारनामा रद्द करण्याबाबत मागवला खुलासा
नवी मुंबई ः नेरुळ येथील श्री गणेश सोसायटीतील रहिवासी आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्यातील वाद आता सिडको दरबारी पोहोचला आहे. सोसायटीने केलेल्या करारनाम्यातील शर्तींच्या भंगामुळे श्री गणेश सोसायटीला सिडकोसोबत झालेला करार का रद्द करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस डिसेंबर 2019 मध्ये बजावली आहे. सिडकोच्या या भूमिकेमुळे घाबरलेल्या रहिवाशांनी निरनिराळ्या राजकर्त्यांचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केल्याने स्थानिक पुढार्यांची पाचावर धारण बसली आहे.
गेली काही वर्षे श्री गणेश सोसायटीतील रहिवासी व सोसायटीचे पदाधिकारी यांच्यात वाद सुरू असून वादाचे मूळ कारण पुनर्विकास व रहिवाशांना सदर गृहसंकुलात सभासद करून न घेणे हे आहे. यासाठी अनेक रहिवासी याचे खापर संस्थेच्या पदाधिकार्यांवर फोडत असून त्याबाबतच्या तक्रारी त्यांनी अनेक प्राधिकरणाकडे केल्या आहेत. सिडकोकडे नोंद असलेल्या मूळ 500 हून अधिक सभासद असलेल्या या संस्थेच्या अनेक सभासदांनी त्यांची घरे विकल्याने विकत घेणार्या 100 हून अधिक सभासदांना सदसत्व न दिल्याने हा वाद सुरू झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक रहिवासी मंगल घरत यांनी या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर या प्रकरणाने सध्या वेग घेतला आहे. (पान 7 वर)
दरम्यान, मध्यंतरी बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकेची विक्री केली. या आरोपावरून नेरुळ पोलीस स्थानकात याबाबत पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गृहसंकुलातील रहिवाशांनी याबाबत सिडकोकडे तक्रार केली असता सदर सोसायटीने सिडकोचे संमतीपत्र न घेता विकासकासोबत थेट करार करून सदनिका विकल्याचे सिडकोच्या लक्षात आल्याने सिडकोने श्री गणेश सोसायटीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी सिडकोसोबत झालेला करार का रद्द करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा संस्थेकडे मागितला असून, त्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सिडकोच्या या नोटिसीनंतर श्री गणेश सोसायटीमध्ये राहणार्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून त्यांनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी निरनिराळे राजकीय दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. रहिवाशांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पुढार्यांचे धाबे दणाणले असून पालिका निवडणूक तोंडावर असल्याने कोणत्याही प्रकारे संबंधित रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे.
गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांची पिळवणूक स्थानिक पुढारी करत असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला आता वाचा फुटली आहे. सिडकोने नोटीस जरी पाठवली असली तरी कोणाही रहिवाशाला घाबरण्याचे कारण नाही. निवडणूक जवळ आल्याने खोट्या आश्वासनावर पुन्हा रहिवाशांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने अशा भ्रष्टाचारी लोकांपासून रहिवाशांनी सावध राहावे.
- मंगल अ. घरत, स्थानिक रहिवासी, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप