कुकशेत येथे नुतन शाळा इमारतीचे भूमिपुजन

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 85, कुकशेत मध्ये सेक्टर 14, नेरूळ येथे उभारण्यात येत असलेल्या नुतन शाळा इमारतीचे भूमीपुजन, माजी नगरसेवक कै. रामचंद्र लक्ष्मण पाटील नागरी आरोग्य केंद्र नामकरण आणि कुकेशेतगांव प्रवेशव्दार बांधणे कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. 

याप्रसंगी स्थलांतरित झाल्यानंतर कुकशेत गाव नव्या ठिकाणी, नव्या स्वरूपात वसले आणि आता अद्ययावत सोयी सुविधांनी परिपूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त करीत आमदार गणेश नाईक यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण व्हिजनच्या माध्यमातून प्रशस्त व आकर्षक इमारती उभारणीसोबतच विद्यार्थ्यांनी सादर केलेला कलाविष्कार पाहिल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे धोरण चांगल्या रितीने राबविले जात असल्याचे दिसून येते अशा शब्दात कौतुक केले.

याप्रसंगी बोलताना महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबईतील प्रत्येक गावाला एक इतिहास असल्याचे सांगत कुकशेत गांवाच्या वैशिष्ट्यांविषयी भाष्य केले. नवी मुंबई महानगरपालिकेने सन 2000 साली आपल्या क्षेत्रातील जिल्हा परिषदेकडे असलेल्या शाळा हस्तांतरित करून एक व्हिजन डोळ्यांसमोर ठेवत शिक्षणाचा विकास केला आणि त्याची फलश्रुती म्हणजे आता प्रत्येक वर्षी महापालिका शाळांतील पटसंख्या वाढत असल्याचा अभिमान व्यक्त केला. नगरसेवक सुरज पाटील यांनी कुकशेत गावाच्या विकासासाठी प्रभागात होत असलेल्या विविध सुविधा कामांची माहिती दिली तसेच कार्यपूर्तता होत असल्याबद्दल मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले. इंग्रजी व मराठी माध्यमाला सारखेच महत्व दिले जात असल्याचे सांगत त्यांनी दरवर्षी पटसंख्या वाढत असल्याचा अभिमान व्यक्त केला. 

यावेळी नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 11 व 92 च्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सादर झालेल्या नृत्याविष्कारालाही मान्यवरांसह उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. यानिमित्त ‘वेचली काव्यफुले’ या मुलांनी संकलित केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.