विटभट्टयांची होणार चौकशी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तहसीलदारांना निर्देश

नवी मुंबई : वायुप्रदुषणाने खारघर-तळोजा वसाहतीमधील नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खारघर, तळोजा परिसरातील विटभट्टयांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता खारघर, तळोजा परिसरातील विटभट्ट्यांची चौकशी होणार आहे.

खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 27 फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे प्रदूषणाला जबाबदार असलेल्या इतर घटकांसह खारघर आणि तळोजा परिसरात असलेल्या विटभट्टयांमुळे सुद्धा प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रायगड भवन येथील कार्यालयात केली होती. परंतु विटभट्टीधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र लागत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने पनवेल तहसील कार्यालयाला पत्र दिले आहे. या पत्राद्वारे खारघर, तळोजा परिसरातील विटभट्टी मालकांची नाव-पत्यासह माहीती देऊन प्रदूषणाबाबत चौकशी करण्याचे आणि योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

याशिवाय रात्रीच्या वेळी प्रदूषणाबाबत रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही अधिकार्‍यांची नेमणूक केली असून त्यासंदर्भातील एक पत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान, वायू प्रदूषणाविरोधात आंदोलन करण्यार्‍या खारघर-तळोजा वेल्फेअर असोसिएशनने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून प्रदूषणाविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याची माहिती असोसिएशचे अध्यक्ष मंगेश रानावडे यांनी दिली आहे.