मुंबई, ठाणे व बारामतीतून पालिका चालवणार का?

स्थानिक प्रकल्पग्रस्त नेत्यांची भूमिपुत्रांच्या अस्मितेला साद

नवी मुंबई ः मुंबई व ठाणे महानगरपालिकेतून स्थानिक भूमिपुत्रांचे अस्तित्व ज्या पद्धतीने गेल्या 20 वर्षांत संपवण्यात आले, त्याचमार्गावर नवी मुंबईतील भूमिपुत्र असल्याचा आरोप करत स्थानिक पुढार्‍यांनी थेट प्रकल्पग्रस्तांच्या अस्मितेलाच हात घातला आहे. महापालिकेचा कारभार ठाणे, मुंबई व बारामतीतून चालवलेला आवडेल का? असा सवाल करत सर्वच भूमिपुत्र नगरसेवकांना एकजुटीने या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन प्रकल्पग्रस्त नेते मनोहरशेठ पाटील यांनी केल्याने त्यास कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेली 30 वर्षे नवी मुंबईचे राजकारण एकहाती सांभाळणार्‍या गणेश नाईकांपुढे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मोठे आव्हान पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उभे केले आहे. नवी मुंबईचे राजकारण हे आजवर गणेश नाईकांभोवतीच फिरत राहिले आहे; परंतु प्रथमच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईतील काँग्रेसचे अनिल कौशिक व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या वेळी नाईकांचे नवी मुंबईतील संस्थान खालसा करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी केली असून, त्यादृष्टीने जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. या महाआघाडीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. 

महाविकास आघाडीला स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते विरोध करत असून, जर ही आघाडी सत्तेत आली तर महापालिकेचा कारभार मुंबई, ठाणे व बारामतीच्या इशार्‍यावर चालेल, असा प्रचार त्यांनी गावांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. या प्रचारात ते ठाणे आणि मुंबईमधून स्थानिक भूमिपुत्र असलेला कोळी आणि आगरी समाज राजकारणातून कसा अस्तंगत झाला आणि आता बाहेरून आलेल्या नेत्यांच्या ओंजळीने कसे पाणी प्यावे लागत आहे, हे सांगत आहेत. त्यामुळे मोठा परिणाम या प्रचारातून साधला जात असल्याची चर्चा सध्या नवी मुंबईत आहे. राज्याच्या राजकारणात आगरी समाजाचे गणेश नाईक व्यतिरिक्त एकही सक्षम नेतृत्व अस्तित्वात नसल्याची जाणीव स्थानिक नेते या समाजाला करून देत आहेत. त्यामुळे आगरी व कोळी समाजाचा नवी मुंबईतील राजकीय वारसा जिवंत राहण्यासाठी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास स्थानिक प्रकल्पग्रस्त मतदार व नगरसेवक कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


ठाणे व मुंबई येथील आगरी-कोळी नेतृत्व हे त्यांच्यामध्ये एकी नसल्याने कालांतराने संपुष्टात आले आहे. आज मुंबई आणि ठाण्यावर बाहेरून आलेल्या राजकर्त्यांचे वर्चस्व असुन स्थानिक भूमिपुत्राला त्यांच्या ओंजळीने पाणी प्यावे लागत आहे. नवी मुंबईतही याच प्रकारचे राजकारण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असुन नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व संपविण्याचा हा प्रयत्न आहे. सर्वच प्रकल्पग्रस्त नगरसेवकांनी वेळीच हा धोका ओळखुन एकत्रित काम करावे. - मनोहर पाटील, प्रकल्पग्रस्त नेते