बारचालकाची आत्महत्या

पनवेल : सुकापूर परिसरातील टायटन लेडीज सर्व्हिस बारच्या चालकाने बारपासून काही अंतरावर असणार्‍या आदई तलावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री आत्महत्या केली. शेखर शेट्टी (45) असे मृत बारचालकाचे नाव असून शनिवारी दुपारी 4 वाजता स्थानिक नागरिकांनी मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

लेडीज सर्व्हिस बारचालकाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. शेखर यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यावर तेथील नागरिकांना शेखर यांची ओळख पटली. शेट्टी यांनी आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. उलवे परिसरात राहणारे शेखर शेट्टी यांनी टायटन हा बार चालविण्यासाठी घेतला होता. काही महिन्यांपासून त्यांचा बार चालत नसल्याने दोन महिन्यांपासून त्यांनी हा बार बंद ठेवला होता. तणावाखाली शेखर यांनी हे पाऊल उचलले. पोलिसांना शेखर यांच्या पाकिटात आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेत असल्याचे स्पष्ट केले होते. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. कामत हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.