21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे देशासमोर मोठं संकट उभं राहिले आहे. झपाट्याने संसर्ग होणार्‍या या रोगाची साखळी तोडण्यासाठी पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नागरिकांनी पुढील 21 दिवसांसाठी घरातून बाहेर पडण्याचा विचारही करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

जगातील सामर्थ्यशाली देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. या देशांकडे साधनांची कोणतीही कमतरता नाही किंवा ते प्रयत्न करत नाहीत, असेही नाही. मात्र, कोरोना विषाणू इतक्या वेगाने फैलावत आहे की, सर्व तयारी करूनही या देशांपुढील समस्या वाढतच आहेत. त्यामुळे आपण असाच निष्काळजीपणा सुरु ठेवला तर आगामी काळात देशाला याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अर्थात एकमेकांपासून दूर राहणे, हाच एकमेव उपाय आहे. अन्यथा काही लोकांच्या बेपर्वाईमुळे अनेक कुटुंब आणि संपूर्ण देश धोक्यात येऊ शकतो, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. लॉकडाऊनच्या 21 दिवसांच्या काळात भारताल मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल. मात्र, सध्याच्या घडीला माझ्यासाठी प्रत्येक भारतीयाचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्य सरकारांनाही आरोग्य व्यवस्थेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मोदींनी यावेळी सांगितले.