जेएनपीटीच्या कार्गो हाताळणीत वाढ

लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीने केली 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांची हाताळणी 

उरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हेभारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता आणि देशांतर्गत आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने जेएनपीटीमध्ये मालवाहतूकीमध्ये निरंतर वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान जेएनपीटीला विविध आव्हानांचा सामना करावा लागला, तरी सुद्धा जेएनपीटीने 31ऑगस्ट,2020 पर्यंत 1,643,784 टीईयू आणि 694 जहाजांचीहाताळणी करीत उल्लेखनीय कार्य केले आहे. 

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या कालावधीत माल हाताळणीमध्ये35 टक्क्यांहून अधिक घट झाली होती, परंतु  ऑगस्ट महिन्यापर्यन्त हळू-हळू ही घट 16.61% पर्यंत खाली आली आणि आता पोर्ट आपल्या कोविडच्या पूर्व कामगिरीच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आतापर्यंतच्या कामगिरीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की यापुढेही जेएनपीटी अशीच प्रगती सुरू ठेवेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासूनच, जेएनपीटीने आपले भागधारक, कर्मचारी, शिपिंग कंपन्या आणि स्थानिक समुदायासाठी अनेक उपाय योजना केल्या. योग्य वेळेवर केल्या गेलेल्या या उपाययोजनांमुळे जेएनपीटी प्रत्येक महिन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करीत आहे. जेएनपीटीने जुलै 2020 महिन्यात हाताळणी केलेल्या 3,44,316 टीईयूच्या तुलनेत ऑगस्ट 2020 महिन्यात 3,52,735 टीईयूची मालाची हाताळणी केली आहे. ऑगस्ट, 2019 मध्ये जेएनपीटीने 5.68 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली होती, त्या तुलनेत ऑगस्ट, 2020 महिन्यात जेएनपीटीनेएकूण 4.74 दशलक्ष टनमालाची हाताळणी केली आहे. 

जेएनपीटीच्या कामगिरीविषयी बोलताना पोर्टचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, बंदरे ही  लॉजिस्टिक साखळीतील महत्त्वाचा दुवा असतात आणि गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने ही भूमिका अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली आहे. त्याचबरोबरगेल्या काही महिन्यात खालावलेल्या कामगिरीमध्ये होऊन आम्ही आता पुन्हा उभारी घेण्याच्या मार्गावर आहोत. कोविड - 19 च्या साथीच्या काळात पोर्टचे कामकाज निरंतर सुरू ठेवण्यासाठी आणि लॉजिस्टिक सप्लाय चेन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आम्ही अनेक उपाय केले आहेत. त्याचबरोबर जेएनपीटी हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये रुपांतरित करून आम्ही स्थानिक समुदायाला या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.