चोरीच्या घटनांत वाढ

नवी मुंबई : एक सप्टेंबरपासून टाळेबंदी शिथिल केल्यानंतर सोनसाखळी व मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले असून केवळ आठ दिवसांत वीसपेक्षा जास्त घटना घडल्याचे पोलीस गुन्हेगारी आलेखात स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत 26 घटना घडल्याची नोंद आहे.

चोर्‍या करणारी टोळी सक्रिय झाली असून नागरिकांनी सोनसाखळी, मंगळसूत्र आणि मोबाइल या मौल्यवान वस्तूंचा वापर सावधनतेने करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली होती. ही टाळेबंदी सप्टेंबरपासून शिथिल करण्यात आली आहे. पाच महिन्यांच्या टाळेबंदीमुळे देशाचे सकल उत्पन्न मोठया प्रमाणात घसरले असून मोठया प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा वेळी गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार हे स्पष्ट दिसून येत आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवडयात नवी मुंबईत विविध ठिकाणी वीसपेक्षा अधिक सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याचे दिसून येते.

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा संचार वाढला असून बेरोजगार तरुणांनी सोनसाखळी व मोबाइल चोरीकडे मोर्चा वळविल्याचे एका उच्च पोलीस अधिकार्‍याने सांगितले. शुक्रवारी ऐरोली येथे एका नागरिकाच्या गळ्यातील चार तोळ्यांची सोनसाखळी चोरटयांनी लंपास केली. मोटारसायकलवरून येणे व मागे बसलेल्या चोरटयाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र अथवा हातातील महागडे मोबाइल खेचून घेऊन जाणे अशी एक चोरीची पद्धत आहे.

सोनसाखळी अथवा मोबाइल चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, मात्र पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढविली असून या चोरटयांच्या संशयित टोळ्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. नागरिकांना किमती वस्तूंची स्वत:हून काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे. सोन्याचे भाव वाढल्यानेही ह्या चोर्‍यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

- पंकज डहाणे, उपायुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्तालाय