10 खाजगी रुग्णालयांना पालिकेचा दणका

देयकातील अतिरिक्त 32 लाख रुग्णांना केले परत

नवी मुंबई ः शासनाने दिलेल्या आदेशांना बगल देऊन काही खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांकडून जास्तीते दर आकारले जात होते. याची दखल घेऊन पालिकेने विशेष समितीच्या आधारे देयकांची पडताळणी करुन 10 रुग्णालयातून सूमारे 32 लाख इतकी देयकांमध्ये विसंगती आढळलेली रक्कम नागरिकांना परत केली आहे. 

शासनाच्या अधिसूचनेनुसार खाजगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड बाधितांवर होणार्‍या उपचारांची देयक रक्कम आकारली जावी याबाबतचे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना दिलेले आहेत. तरीही काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व शासन निर्णयाचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी अशा तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्त (1) यांच्या अध्यक्षतेखाली, विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन केली. या समितीच्या वतीने देयकांच्या पडताळणीमध्ये प्रथमदर्शनी दोष आढळलेल्या 10 खाजगी रूग्णालयांना महानगरपालिकेमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या.

नवी मुंबई महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने देयके व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येऊन, एकूण रू. 32,00,422 इतकी देयकांमध्ये विसंगती आढळलेली रक्कम नागरिकांना परत करण्यात आलेली आहे वा एकूण देयक रक्कमेतून कमी करण्यात आलेली आहे अथवा परतावा प्रस्तावित केलेला आहे. 

प्रत्येक खाजगी रूग्णालयांकरिता महानगरपालिकेमार्फत समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला असून याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 उपचार करणार्‍या सर्व रूग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही विशेष पथके महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रूग्णालयांमधील कोव्हीड 19 चा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी करणार आहेत. तसेच पडताळणी दरम्यान एखाद्या रूग्णालयाकडून देयकांमध्ये वारंवार विसंगती केल्याचे आढळून आल्यास व त्यामधून रूग्णाची आर्थिक पिळवणूक होत असल्यास अशा रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना खाजगी रूग्णालयांमध्ये केलेल्या कोव्हीड 19 वैद्यकीय उपचारांविषयी देयकांबाबतच्या तक्रारी सुलभ रितीने दाखल करता याव्यात याकरिता महापालिका मुख्यालयात  कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून 022-27567389 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.