सावधान... वाढीव वीज बिलांच्या नावाखाली लुबाडणारी टोळी सक्रिय

पनवेल : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना वाढीव वीजबिल आले आहे. मात्र याचा गैरफायदा घेत बिल न भरणार्‍यांना कारवाईची भीती दाखवून लुबाडणारी टोळी नवीन पनवेलमध्ये सक्रिय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

पनवेलमध्ये लाखो महावितरणचे ग्राहक आहेत. वाढीव वीजबिलामुळे अनेकांनी आपले वीजबिल भरलेले नाही. अनेकांचे वीजबिल काही महिन्यांपासून थकीत असताना, अशा ग्राहकांची माहिती काढून या ग्राहकांना महावितरणच्या कारवाईची भीती दाखवून लुबाडणारी टोळी पनवेलमध्ये सक्रिय झाली आहे. नवीन पनवेलमधील एका वीज ग्राहकाला थकीत वीजबिल, तसेच विजेचा वापर वाढल्याचे कारण सांगत, त्याच्याकडून लाखो रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात येईल, अशी भीती दाखविली. महावितरणचे नाव सांगत, एका भामट्याने हा प्रकार केल्याचे या ग्राहकाला महावितरण कार्यालयात धाव घेतल्यावर निदर्शनास आले. या ग्राहकाचे वीजमीटरही संबंधित इसम घेऊन गेल्याचा प्रकार महावितरण अधिकार्‍यांच्या भेटीनंतर उघड झाला. महावितरणकडे या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत असून, ग्राहकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन महावितरण अधिकार्‍यांमार्फत करण्यात येत आहे. मागील काही महिन्यांपासून बिल न भरलेल्या नागरिकांना जाब विचारून त्यांची लुबाडणूक होत असल्याचे या प्रकारामधून उघड झाले आहे.

कोट

महावितरणच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात एकही ग्राहकाची वीजजोडणी खंडित केलेली नाही, अथवा ग्राहकांच्या घरात भेट देत मीटर चेकिंग केले गेलेले नाही. खोटी कारणे सांगून ग्राहकांना धमकावले जात असल्यास संबंधित इसमाकडून ओळखपत्राची मागणी करावी व महावितरणकडे या संदर्भात तत्काळ तक्रार करावी.- जयदीप नानोटे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पनवेल शहर उपविभाग महावितरण