ऑक्सिमीटर, थर्मल गनच्या मागणीत वाढ

कळंबोली : पनवेल पालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या बाहेर गेली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्याकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, पनवेल परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनलॉकमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे नागरिक घराबाहेर पडत आहेत. सुरक्षिततेसाठी घरीच हळदीचे दूध, गरम वाफ घेणे आदी उपाय केले जात आहेत. त्याचबरोबर, औषधी दुकानातून ऑक्सिमीटर खरेदी करण्याचा कल वाढला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे व कोरोना संसर्ग नसलेले नागरिक आपल्या शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर तर शरीरातील तापमान चेक करण्यासाठी थर्मल गनची खरेदी करत आहेत. त्यामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ झाली आहे. सद्य परिस्थितीत सॅनिटायझर व मास्कच्या ची मागणी घटली आहे. सुरुवतीला एन 95च्या मास्कचा वापर करण्यावर भर दिला जात होता. कालांतराने घरगुती मास्कचा वापर वाढल्याने औषध दुकानातून मास्क खरेदी घटली आहे.