जेएनपीटी बंदरात कांदा पडून

उरण ः केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. निर्यात बंदी जाहीर करून कांदा उत्पादकांची कोंडी झाली आहे. नाशिकहून निर्यातीसाठी निघालेला चारशे ट्रकमधील चार लाख टन कांदा उरण येथील जेएनपीटीच्या बंदरात निर्यातीच्या प्रतीक्षेत आहे.

कांद्याचे पुरवठादार राज्य म्हणूनच महाराष्ट्राची ओळख आहे. निर्यातीला बंदी घालण्यापूर्वी तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याला 20 ते 30 रुपये प्रति किलो भाव मिळत होता. बंदी घातल्यानंतर या भावात घसरण होऊन तो आता 15 ते 26 रुपये प्रति किलो (गुणवत्ता आणि आकाराप्रमाणे) मिळू लागला आहे. सरासरी हा दर 21 रुपये आहे. निर्यात बंदीनंतर कांद्याच्या भावात पाच ते दहा रुपयांनी अचानक घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मार्च ते मे महिन्यात साठवण केलेल्या कांद्यावर गंडांतर आले असून निर्यातीला बंदी घातल्याचा फायदा ग्राहकांना होणार असला तरी शेतकरी अडचणीत सापडणार आहे. 

कांदा उत्पादकांना चांगले दिवस येत असताना केंद्र सरकराने अचानक निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे साठवण कांद्याला भाव मिळणार नाही, पावसाळी कांद्याही अवकाळी पावसाने सडलेला आहे. सर्व सुरळीत सुरू असताना निर्यात बंदी करून कांदा उत्पादक अडचणीत आणले जात असून कांदा उत्पादक सर्वच बाजूने संकटात सापडला आहे.

- अशोक वाळुंज, संचालक, एपीएमसी