Breaking News
नवी मुंबई : कोरोना काळात पालिकेचे वाशी येथील रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव करण्यात आल्याने इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय सुरू होती. त्यामुळे पालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने आता हा विभाग सुरू केला आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. सकाळी 9 ते 1 या वेळात हा विभाग सुरू राहणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर नवी मुंबई महापालिकेचे 300 खाटांचे वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय हे मार्चमध्ये कोरोनासाठी राखीव करण्यात आले होते. या ठिकाणी फक्त कोरोना रुग्णांवरच उपचार करण्यात येत होते. त्यामुळे सामान्य रुग्णांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात कोरोनाच्या भीतीमुळे शहरातील विविध उपनगरांत असलेले 1400 दवाखाने बंद ठेवल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. साधे पोटदुखीचा रुग्ण असला तरी अनामत रकमेची मागणी होत होती. त्यामुळे गरीब रुग्णांना या काळात उपचार मिळत नव्हते. त्यामुळे वाशी येथे पुन्हा सामान्य आजारांच्या रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करण्याची मागणी वारंवार होत होती. या मागणीचा विचार करून वाशी येथील पालिका रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्याची अद्याप व्यवस्था नाही. येथील रुग्णालयात 175 खाटा असून त्या सर्व खाटांवर करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे इतर रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai