पालिकेला हवेत 251 कोटी

निधी मिळविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर

नवी मुंबई : जगभर पसरलेल्या महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक पातळीपासून स्थानिक पातलीपर्यंत सर्वच यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाही सर्वोतपरी प्रयत्नशील आहे. मार्चपासून जवळपास 137 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती निवारण निधीतून 251 कोटी रुपये मिळावे, असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनास दिला आहे. आतापर्यंत शासन व आमदार निधीतून मनपास 11 कोटी 88 लाख रुपये मिळाले असून, जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

नवी मुंबईमध्ये 13 मार्चला पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून महानगरपालिकेने तत्काळ संपूर्ण लक्ष कोरोना नियंत्रण व उपाययोजनांवर केंद्रित केले. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले. रुग्णवाढीचा अंदाज लक्षात घेऊन वाढीव बेड्स, औषध खरेदी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शहरातील रुग्णसंख्या 30 हजार झाली असून, आतापर्यंत 26 हजार नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. साडेसहाशे नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रतिदिन 300 ते 400 नवीन रुग्ण वाढत असून, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. महानगरपालिकेने मार्चपासून जवळपास 137 कोटी रुपये खर्च केले आहेत. खर्चाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे.कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मालमत्ता, पाणी व इतर करांतून येणारी रक्कम वेळेत मिळत नाही. खर्चाचा आकडा मात्र झपाट्याने वाढत आहे. महामारीशी मुकाबला करण्यासाठी शासनाकडूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शासनाच्या आपत्ती निवारण विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेस 251 कोटी रुपये मिळावे, अशी मागणी महानगरपालिकेने केली आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला आहे. आतापर्यंत शासनाने महानगरपालिकेला 10 कोटी 40 लाख रुपये व 1 कोटी 44 लाख रुपये आमदान निधी मिळून 11 कोटी 88 लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय शासनाकडून दहा अत्याधुनिक व्हेंटिलेटर्सही मिळाले आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध झाल्यास मनपाच्या तिजोरीवरील भार काही प्रमाणात हलका होणार आहे. यामुळे प्रशासनानेही पाठपुरावा सुरू केला आहे.