रायगडमध्ये कोविड कॉर्नर उभारणार

अलिबाग ः करोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड कॉर्नर तयार करण्यात येणार असून तेथे रुग्णांसाठी दोन खांटाची सोय करण्यात येणार आहे. यामुळे कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होणार आहेत. कोविड कॉर्नर तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून तपासणी मोहिमेत आरोग्य यंत्रणेसह, शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका व अन्य स्वयंसेवकांचा सहभाग राहणार आहे. यासाठी जिल्ह्यात 1500 आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक केली असून 50 वर्षांपुढील आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांना तसेच अन्य आजार असलेल्यांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली असेल, तसेच त्यांची अ‍ॅटीजन तपासणी केली असेल त्यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे.