फुफ्फुसातून काढला 16 सेंटिमीटरचा ट्यूमर

15 वर्षीय मुलाला मिळाले जीवदान

मुंबई : मुंबईतील एका 15 वर्षीय मुलाच्या फुफ्फुसातून 16 सेंटिमीटरचा ट्यूमर काढण्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. या गाठीचे वजन 1.5 किलो इतके होते. या शस्त्रक्रियेमुळे मुलाचे प्राण वाचले आहे.

भायखळा मध्ये राहणारा प्रतीक बरकडे या मुलाच्या उजव्या छातीच्या पोकळीत 16 सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची सुमारे दीड किलो वजनाची गाठ होती. ही गाठ एखाद्या फुटबॉल इतकी मोठी होती. या गाठीला सॉलिटरी फ्रायबर ट्यूमर असे म्हणतात. या मुलाला छातीत दुखणं, दम लागणं, खोकला आणि श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला होता. ही कोविड-19 ची लक्षणं असल्याने कुटुंबियांना तातडीने वोक्हार्ट रूग्णालय गाठले. याठिकाणी छातीचा सीटीस्कॅन करण्यात आला. या वैद्यकीय चाचणी अहवालात फुफ्फुसात गाठ असल्याचं निदान झालं. हा ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टरांना सांगितले.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिस सर्जन डॉ. उपेंद्र भालेराव यांच्या नेतृत्वाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे. ’फुफ्फुसात आढळून येणारे हे ट्यूमर अतिशय दुर्मिळ असते. धुरामुळे होणार्‍या संसर्गामुळे हा त्रास उद्भवू शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असल्याचे ते पुढे म्हणाले.