मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन

पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसेसैनिकांनी केला रेल्वेने प्रवास 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागलेल्या लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा ठप्प आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग आंदोलन केले. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व इतर कार्यकर्त्यांनी निर्बंध झुगारुन लोकलने प्रवास केला.

मुंबईत कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जात आहे. पण, यामुळे चाकरमान्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. त्यामुळेच मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती. मनसेनं आज सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर रेल्वे पोलिसांकडून संदीप देशपांडे यांना आंदोलन न करण्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, तरीही पोलिसांना गुंगारा देऊन संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकार्‍यांनी लोकलमध्ये प्रवेश करून प्रवास केला.