शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस

निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत मागितले स्पष्टीकरण

मुंबई : आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवून निवडणूक प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण मागवलं आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे. खुद्द शरद पवार यांनीच याबाबत मुंबईतील पत्रकार परिषदेत माहिती दिली. या नोटीसविषयी विचारलं असता देशात आमच्यावर विशेष प्रेम असल्याची खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

नोटीसबाबत शरद पवार म्हणाले की, नोटीस आधी मला आली, सुप्रियाला काल संध्याकाळी नोटीस येणार होती. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला 10 हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे.

इतकंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसंच सुप्रिया सुळे यांनाही नोटीस मिळल्याचं पवारांनी सांगितलं.