रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई ः ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. तसेच रिया चक्रवर्ती हिने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज प्रकरणात 25 सेलिब्रिटजची नावे समोर आली आहेत.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 8 सप्टेंबरला अटक केली. त्यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान रिया आणि शौविकने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्याच्यावर 23 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडित ड्रग्ज प्रकरणासंदर्भात क्षणाक्षणाला नव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. दरम्यान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात ड्रग्जवरून झालेला संवाद नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) विभागाच्या हाती लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर मॅनेजर करिश्माला चौकशीसाठी एनसीबीने बोलावले असून दीपिका पदुकोणलाही चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिया चक्रवर्ती हिने चौकशीत श्रद्धा आणि साराची नावे घेतली आहेत. दुसरीकडे, रिया हिची मॅनेजर जया शहा हिची सोमवारी चौकशी झाली. एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत डी, एन, एस, के अशी नावे समोर आली आहे. त्यांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात येणार आहे.